क्रिकेटप्रेमींचा सर्वात आवडता महिना म्हणजे एप्रिल-मे. कारण, या दोन महिन्यात इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल खेळली जाते. परंतु, यंदा २९ मार्चपासून सुरु होणाऱ्या आयपीएलच्या तेराव्या हंगामावर कोरोना व्हायरसचे सावट पसरले होते. त्यामुळे आयपीएल २०२० अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली होती.
पण, आता चाहत्यांच्या निराश चेहऱ्यावर उत्सुकता पाहायला मिळत आहे. ही उत्सुकता आहे, १९ सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिराती (युएई)मध्ये सुरु होणाऱ्या आयपीएलची. यावेळी आयपीएल एकूण ५३ दिवस चालेल. त्यामुळे आयपीएल २०२०चा अंतिम सामना १० नोव्हेंबरला होईल.
आजवर आयपीएल इतिहासात अनेक मोठ-मोठे विक्रम बनले आहेत. पण, यंदाचा आयपीएल हंगाम काही क्रिकेटपटूंसाठी खूप विशेष ठरणार आहे. कारण, आयपीएल २०२०मध्ये काही दिग्गज क्रिकेटपटू असे विक्रम आपल्या नावावर करु शकतात, जे आयपीएलच्या इतिहासात कुणीही केले नाहीत.
चला तर पाहूया, नक्की कोणते असतील ते मोठे विक्रम, जे आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच नोंदवले जातील. 5 Big Records Can Be Made In IPL 2020
१. एमएस धोनी करु शकतो त्याच्या यष्टीमागील १५० विकेट्स पूर्ण
एमएस धोनी हा जगातील सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक फंलदाजांपैकी एक आहे. धोनीने आयपीएलच्या १२ हंगामात १९० सामने खेळत यष्टीमागे एकूण १३२ विकेट्स घेतल्या आहेत. दरम्यान त्याने ९४ फलंदाजांना यष्टीमागे झेलबाद केले आहे, तर ३८ फलंदाजांना यष्टीचीत केले आहे. धोनी हा आयपीएलमध्ये यष्टीमागे सर्वाधिक विकेट्स घेणारा अव्वल क्रमांकाचा यष्टीरक्षक आहे. जर धोनीने आयपीएल २०२०मध्ये यष्टीमागे १८ विकेट्स घेतल्या, तर तो त्याच्या यष्टीमागील १५० विकेट्स पूर्ण करु शकतो.
असे असले तरी, भारताचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक धोनीच्या जास्त मागे नाही. त्याने आयपीएलमध्ये यष्टीमागे १३१ विकेट्स घेत आयपीएलमध्ये यष्टीमागे सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या यष्टीरक्षकांच्या यादीत धोनीनंतर दूसरा क्रमांक पटकावला आहे. त्यामुळे दिनेशकडेही आयपीएल २०२०मध्ये त्याच्या यष्टीमागील १५० विकेट्स पूर्ण करण्याची संधी आहे.
२. लसिथ मलिंगा बनू शकतो २०० विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज
श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा हा २००९ पासून आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघाचा भाग आहे. त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये १२२ सामने खेळत १९.८०च्या सरासरीने आणि ७.१४च्या इकोनॉमी रेटने १७० विकेट्स घेतल्या आहेत.
मलिंगाचे आयपीएलमधील गोलंदाजी प्रदर्शन नेहमीच शानदार राहिले आहे. तो मुंबई इंडियन्स संघातील डेथ ओव्हर्स स्पेशलिस्ट आहे. आयपीएल २०२०मध्ये खेळताना जर मलिंगाने ३० विकेट्स घेतल्या, तर तो आयपीएल इतिहासात २०० विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज बनू शकतो.
३. विराट कोहली बनू शकतो आयपीएलमध्ये ६००० धावा करणारा पहिला फलंदाज
विराट कोहलीला आयपीएल इतिहासातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांमध्ये गणले जाते. त्याने आयपीएलमध्ये १७७ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने १६९ डावात फलंदाजी करत ३७.८४ सरासरीने ५४१२ धावा केल्या आहेत. यात त्याच्या ५ शतकांचा आणि ३६ अर्धशतकांचा समावेश आहे.
विराटचा आयपीएलमधील स्ट्राईक रेट हा १३१.६१ इतका आहे. तर, त्याचा आयपीएलमधील सर्वाधिक स्कोर हा ११३ धावा इतका आहे. विराटने आतापर्यंत आयपीएलमध्ये ४८० चौकार आणि १९० षटकार मारले आहेत. आयपीएलच्या तेराव्या हंगामात विराटकडे ६००० धावा पूर्ण करण्याची संधी आहे. यासाठी त्याला ५८८ धावांची आवश्यकता आहे. जर, विराटने आयपीएल २०२०मध्ये ५८८ धावा केल्या, तर आयपीएल इतिहासात ६००० धावा करणारा तो पहिलाच फलंदाज बनेल.
४. सुरेश रैना बनू शकतो आयपीएलमध्ये २०० सामने खेळणारा पहिला खेळाडू
मिस्टर आयपीएल सुरेश रैना हा पहिल्या हंगामापासून (२००८) आयपीएलचा भाग आहे. तो आतापर्यंत चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात लायन्स या दोन संघांकडून खेळला आहे. २००८ ते २०१९ पर्यंत रैनाने एकूण १९३ सामने खेळले आहेत. दरम्यान त्याने ३३.३४च्या सरासरीने ५३६८ धावा केल्या आहेत.
आतापर्यंत आयपीएलमध्ये १९० किंवा त्यापेक्षा जास्त सामने खेळणारे केवळ दोन खेळाडू आहेत. एक म्हणजे सुरेश रैना, ज्याने १९३ सामने खेळले आहेत. दूसरा म्हणजे एमएस धोनी, ज्याने १९० सामने खेळले आहेत. जर, रैनाने आयपीएलच्या तेराव्या हंगामात ७ सामने खेळले, तर तो आयपीएलमध्ये २०० सामने खेळणारा पहिला खेळाडू बनू शकतो. त्याच्यापाठोपाठ धोनीलाही २०० आयपीएल सामने पूर्ण करण्याची संधी आहे. यासाठी त्याला अजून १० सामने खेळावे लागतील.
५. डेव्हिड वॉर्नर बनू शकतो ५० अर्धशतके पूर्ण करणारा पहिला फलंदाज
डेव्हिड वॉर्नरला आयपीएल २०२०मध्ये एक नवा विक्रम आपल्या नावावर करण्याची संधी आहे. त्याने आयपीएलमध्ये एकूण ४४ अर्धशतके केली आहेत. जर त्याने यंदा आयपीएलमध्ये ६ अर्धशतके केली, तर तो आयपीएलमध्ये ५० अर्धशतके करणारा पहिला फलंदाज बनू शकतो.
वॉर्नर आयपीएलमध्ये सनराइजर्स हैद्राबाद आणि दिल्ली कॅपिटल्स संघांकडून खेळला आहे. त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत १२६ सामने खेळत ४७०६ धावा केल्या आहेत. यात त्याच्या ४ शतकांचा समावेश आहे.
ट्रेंडिंग लेख –