भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान सिडनी येथे नुकत्याच पार पडलेल्या मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने पराभवाच्या उंबरठ्यावर असूनही ऐतिहासिक कामगिरी करत सामना अनिर्णित राखला. भारतीय संघाच्या लढाऊ वृत्तीचे संपूर्ण क्रिकेट विश्व कडून कौतुक केले जात आहे. भारताला या सामन्यात शेवटच्या दिवशी विजयासाठी ३०९ धावांची गरज होती आणि हातात ८ विकेट्स होत्या. त्यानंतरही भारताने संपूर्ण दिवस खेळून काढत सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवल्याने भारतीय संघाचे जोरदार कौतुक होत आहे.
मात्र विदेशात ही काही पहिलीच वेळ नाही जेव्हा भारतीय संघाने पराभवाच्या गर्तेत असूनही सामना अनिर्णित राखला. आपण या लेखात बघणार आहोत असे 5 प्रसंग जेव्हा भारतीय संघाने पराभवाच्या गर्तेतूनही सामना अनिर्णित राखला.
5) इंग्लंड ( 1980) –
इंग्लंड येथे 1980 साली ओव्हलच्या मैदानावर अत्यंत विपरीत परिस्थितीतही लिटल मास्टर सुनील गावसकर यांच्या झुंजार खेळीने भारताने सामना अनिर्णित राखला होता. इंग्लंड विरुद्ध 438 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने 8 बाद 429 धावा केल्या. यामध्ये सुनील गावसकर यांनी 221 धावांची ऐतिहासिक खेळी केली होती.
4) इंग्लंड (1990)
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या झुंजार शतकी खेळीने भारतीय संघाने इंग्लंडमध्येच एक ऐतिहासिक सामना अनिर्णित राखला होता. 408 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करतात भारतीय संघाने एक वेळ 6 गडी गमावत 183 धावा केल्या होत्या. मात्र यावेळी युवा सचिन रमेश तेंडुलकर नावाच्या खेळाडूने मैदानावर संकल्प व विश्वासपूर्ण खेळ करत सामना अनिर्णित राखला. जणू काही या खेळीनंतरच क्रिकेट विश्वात सचिन युग सुरू झाले होते.
3) दक्षिण आफ्रिका (2001)-
दक्षिण आफ्रिकेतील पोर्ट एलिझाबेथ येथे 2001 साली भारतीय संघाने सांघिक कामगिरी करत सामना अनिर्णित राखला होता. दक्षिण आफ्रिकेने एका अवघड पिचवर भारतासमोर 395 धावांचे लक्ष्य ठेवले होते.भारतीय संघाची हार निश्चित मानली जात होती, मात्र राहुल द्रविड व दीप दासगुप्ता यांनी दक्षिण आफ्रिकेच्या विजयाच्या आशेवर पाणी फेरले. द्रविडने 241 चेंडू खेळत 87 तर दीप दास गुप्ता याने 281 चेंडू खेळून 67 धावा केल्या होत्या. हा सामना चेंडू छेडछाड विवादासाठी देखील मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे.
2) इंग्लंड (2007) –
इंग्लंड विरुद्ध 380 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने महेंद्रसिंग धोनीच्या झुंजार खेळी व पावसाच्या मदतीने सामना अनिर्णित राखला होता. भारतीय संघाला तब्बल चार सत्र फलंदाजी करणे आवश्यक होते. यावेळी धोनीने 150 चेंडूत 76 धावांची खेळी केली होती. भारताने पाचव्या दिवशी 9 गडी गमावले होते. मात्र शेवटचे सत्र पावसामुळे रद्द करण्यात आले व भारताने सामना अनिर्णित राखला.
1) न्यूझीलंड (2009) –
न्यूझीलंड विरुद्ध फॉलोऑन मिळाल्यानंतर भारतीय संघासमोर 5 सत्र खेळण्याचे मोठे लक्ष होते. पण अशा गंभीर परिस्थितीतही गौतम गंभीरने संघासाठी उत्तम खेळी केली. खरं तर हा सामना ओळखला जातो तो गंभीरच्या झुंजार खेळीमुळेच. गंभीरने भारताच्या दुसऱ्या डावात तब्बल 436 चेंडूंचा सामना करत 137 धावा बनविल्या. या सामन्यात राहुल द्रविड ,सचिन तेंडुलकर व लक्ष्मण यांनी देखील गंभीरला उत्तम साथ देत ऐतिहासिकरीत्या सामना वाचवला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
सईद मुश्ताक अली ट्रॉफी : सुरेश रैनाची खराब कामगिरी; सलग दुसर्या सामन्यात उत्तरप्रदेशचा पराभव
राजस्थान रॉयल्स संघातून स्टीव्ह स्मिथची होणार हकलपट्टी?
ज्यादा हो रहा हैं! बुमराह चौथ्या कसोटीतून बाहेर पडल्याच्या बातमीनंतर मिम्स व्हायरल