लांबणीवर गेलेल्या आयपीएल २०२० ची तयारी सुरू झाली आहे. ही स्पर्धा आता १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये सुरू होईल. जगभरातील खेळाडू या लीगमध्ये खेळण्यासाठी दाखल होतात. आयपीएलने तरुण खेळाडूंना व्यासपीठ दिले आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही काही दिग्गजांनी आयपीएलवर आपली छाप सोडली आहे.
या लीगमध्ये सचिन तेंडुलकर, रिकी पॉन्टिंग, शेन वॉर्न आणि ब्रेंडन मॅक्युलमसारख्या दिग्गजांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. आयपीएल काही नवीन खेळाडूंना दरवर्षी चमकण्याची संधी देते, तर अनेक दिग्गज खेळाडू दरवर्षी या लीगमधून निवृत्त होऊन क्रिकेटचा निरोप घेतात.
या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊया, जे खेळाडू २०२० आयपीएलमध्ये शेवटचे खेळू शकतात.
१) ख्रिस गेल
टी२० क्रिकेटमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणारा कॅरेबियन दिग्गज आणि डावखुरा फलंदाज ख्रिस गेल गेल्या काही वर्षांत अपेक्षेप्रमाणे खेळताना दिसला नाही.
२०१८ आयपीएल लिलावावेळी ३ फेऱ्यांमध्ये त्याला कोणत्याही संघाने विकत घेतले नव्हते, तेव्हा त्याच्याबद्दल बरीच चर्चा झाली होती. त्यानंतर किंग्ज इलेव्हन पंजाबने त्याच्या संघात समाविष्ट केले. आयपीएल २०११ ते २०१७ पर्यंत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळताना गेल आपल्या अप्रतिम फलंदाजीने प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडत.
गेल आता ४० वर्षांचा झाला आहे, आयपीएलचा हा हंगाम खेळून त्याला क्रिकेटमधून निरोप घ्यायला आवडेल. गेलने आयपीएलमध्ये आत्तापर्यंत १२५ सामने खेळले असून त्यामध्ये त्याने ३२६ षटकार ठोकले आहेत. चाहत्यांना त्याच्या शेवटच्या मोसमातही त्याच्याकडून अशीच काहीतरी कामगिरी बघायला आवडेल.
२) शेन वॉटसन
शेन वॉटसन निःसंशयपणे टी२० क्रिकेटमधील सर्वात यशस्वी खेळाडूंपैकी एक आहे. अलिकडच्या वर्षांत वॉटसनने आयपीएलमधील शेवटच्या दोन वर्षांत ३२ सामन्यांमधून ९५३ धावा करत टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले.
२००८ व २०१३ साली आयपीएलचा सर्वोत्कृष्ट खेळाडू राहिलेल्या वॉटसनने, २०१८ आयपीएल अंतिम सामन्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात शानदार शतक झळकवून, चेन्नईला आयपीएलचे विजेतेपद मिळवून दिले. वॉटसन यापूर्वीच घरगुती क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे आणि या ३९ वर्षीय खेळाडूला तंदुरुस्तीच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
क्षेत्ररक्षण करताना या वॉटसनचे वय निश्चितच दिसते. यामुळे, वाॅटसन यावर्षी अखेरच्या वेळी आयपीएल खेळताना दिसू शकतो.
३) हरभजन सिंग
२०१६ मध्ये भारतीय संघासाठी अखेरचा सामना खेळलेला दिग्गज ऑफस्पिनर हरभजन सिंग, ज्याच्यासाठी आता कदाचित भारतीय संघात परतण्याची सर्व दारे जवळजवळ पूर्णपणे बंद झाली आहेत. हरभजन सिंगने आयपीएलमध्ये आपल्या कारकिर्दीची सुरुवात मुंबई इंडियन्सच्या संघाकडून केली. त्याने काहीकाळ मुंबईच्या संघाचे नेतृत्वदेखील केले.
२००७ ते २०१७ या काळात मुंबई इंडियन्सकडून खेळताना तो आयपीएलच्या तीन ट्रॉफी जिंकला. २०१८ पासून, हरभजनने चेन्नई सुपर किंग्जसाठी खेळण्यास सुरवात केली. त्याने चेन्नईकडून पहिल्या सत्रात सरासरीकामगिरी केली. त्यावेळी, तो १३ सामन्यांत ३८.५७ च्या सरासरीने केवळ ७ विकेट घेवू शकला. त्याचा २०१९ चा मोसम मात्र शानदार गेला. हरभजनने ११ सामन्यांत १९.५० च्या सरासरीने १६ गडी बाद केले. या हंगामानंतर ४० वर्षीय हरभजन सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतो.
४) अमित मिश्रा
आंतरराष्ट्रीय स्तरावर अमित मिश्राला स्वत: ला सिद्ध करण्याची फारशी संधी मिळाली नसली तरी, आयपीएलमधील तो एक मोठा खेळाडू मानला जातो. मिश्रासाठी आयपीएलची मागील काही सत्रे अपेक्षेप्रमाणे गेली नाहीत.
खराब फॉर्म असला तरी, मिश्रा दिल्ली कॅपिटल्सचा मुख्य खेळाडू म्हणून कायम आहे. गेल्या आयपीएल हंगामात अमित मिश्रा ११ सामने खेळून केवळ ११ बळी घेऊ शकला होता. दिल्ली संघ निश्चितच त्याला आगामी हंगामात आणखी एक संधी देईल.
आयपीएलच्या इतिहासात मिश्रा हा एकमेव गोलंदाज आहे, ज्याने तीन हॅटट्रिक घेतल्या आहेत. याचबरोबर, आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक बळी घेणाऱ्या खेळाडूंत त्याचा दुसरा क्रमांक लागतो. मिश्राने, आयपीएलमध्ये १५७ बळी घेतले असून मलिंगापासून तो फक्त १३ बळी मागे आहेत.
३६ वर्षीय मिश्रा तंदुरुस्तीच्या कारणामुळे कदाचित आपली शेवटची आयपीएल खेळू शकतो.
५) लसिथ मलिंगा
३६ वर्षीय लसिथ मलिंगा आयपीएलच्या पहिल्या सत्रापासून खेळतोय. तो मुंबई इंडियन्स संघाचा महत्त्वपूर्ण सदस्य आहे. २०१८ च्या मोसमात प्रशिक्षकाच्या भूमिकेत राहिल्यानंतर मलिंगाने आयपीएलच्या १२ व्या मोसमात खेळाडू म्हणून पुनरागमन केले.
श्रीलंकेचा हा दिग्गज वेगवान गोलंदाज काही काळापासून तंदुरुस्तीच्या समस्येशी झगडत आहे. त्यामुळे त्याचा वेगही कमी झाला आहे आणि त्याचा परिणाम गोलंदाजीवरही स्पष्टपणे दिसतोय. कारण, मलिंगाआधी १४० च्या वेगाने गोलंदाजी करत. आता त्याचा वेग १२५ पर्यंत मर्यादित झाला आहे. ज्यामध्ये तो हळूवार चेंडूंचा वापर अधिक करतो. मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापनाला देखील हे माहित आहे.
आयपीएलमधील सर्वात यशस्वी गोलंदाज असलेल्या मलिंगासाठी, कामगिरी, शारीरिक तंदुरुस्ती या आघाड्यांवर मागे पडताना पाहून, हे नक्की आहे की मलिंगा आपला अखेरचा आयपीएल हंगाम खेळणार आहे.
ट्रेंडिंग लेख –
कर्टिस कॅम्फर – आयर्लंड क्रिकेटचा भविष्यातील सितारा
टेस्ट इनिंग्स स्पेशल भाग ८: …आणि कुसल परेराने क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी एक पान लिहिले
संघाला कठीण परिस्थितीतून सावरणारे ५ गोलंदाज, ज्यांनी शेवटच्या षटकात दिल्या ६ पेक्षाही कमी धावा
महत्त्वाच्या बातम्या –
रोहित शर्माला खेलरत्न पुरस्कार मिळणार की नाही? सेहवाग घेणार निर्णय
मुंबई इंडियन्स आर्धी आयपीएल तर लिलावातच जिंकते, माजी क्रिकेटरने केले गमतीशीर विधान
विमानतळावर लाऊंजच्या एका कोपऱ्यात बसून राहिला ‘हा’ खेळाडू, जाणून घ्या कारण..