मुंबई । भारताचा सलामीवीर रॉबिन उथप्पा गेल्या 5 वर्षापासून भारतीय संघाबाहेर आहे. तरीही तो संघात परतण्याची आशा बाळगून आहे. भारतीय संघातील वाढती युवा स्पर्धा आणि फिटनेस यामुळे तो संघात स्थान पक्के करू शकला नाही. दरम्यान, आयपीएलच्या काही हंगामात त्याने दमदार कामगिरी केली आहे. तरीही त्याला संधी मिळत नाही.
ट्विटर अकाऊंटवर चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना उथप्पा म्हणाला की, ‘आयपीएलच्या या हंगामात चांगली कामगिरी केली तर भारतीय संघात पुनरागमन करण्याचा मार्ग मोकळा होऊ शकेल.’
“मी असा व्यक्ती आहे, जो नेहमी सकारात्मक असतो. नकारात्मक परिस्थितीतही आशेचा किरण पाहतो. त्यामुळे मला वाटते की मी पुन्हा एकदा भारतीय संघाकडून खेळेन. मी जे स्पर्धात्मक क्रिकेट खेळतो ते नेहमीच आपल्या देशासाठी खेळत असतो. म्हणून माझे स्वप्न बर्याच प्रमाणात जिवंत आहे,” असेही तो पुढे म्हणाला.
मुंबई इंडियन्स, पुणे वॉरियर्स सारख्या फ्रँचायझीकडून खेळल्यानंतर उथप्पा मागील अनेक हंगामामध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा महत्त्वाचा भाग होता. जेव्हा 2012 आणि 2014 मध्ये केकेआर संघाने विजेतेपद जिंकले तेव्हा त्याने त्या त्या हंगामात अनुक्रमे 405 आणि 660 धावा केल्या. पण २०२० हंगामात केकेआरने त्याला ‘रिटेन’ केले नाही. यानंतर राजस्थान रॉयल्सने रॉबिनला दोन कोटी देऊन आपल्या संघात घेतले.
उथप्पा 2007 चा टी -20 विश्वचषक जिंकणार्या संघाचा एक भाग होता. 34 वर्षीय उथप्पाने 2006 मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळताना क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने भारताकडून 46 वनडे सामने आणि 13 टी -20 सामने खेळले आहेत. आयपीएलमध्ये त्याने 177 सामने खेळले आहेत आणि 4411 धावा केल्या आहेत. गेल्या हंगामात त्याने 12 सामन्यात 282 धावा केल्या होत्या.