आयपीएल २०२२ (IPL 2022) खेळाडूंसह चाहत्यांसाठीही अनेक कारणांमुळे खास राहणार आहे. यावर्षी लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स हे दोन नवीन संघ स्पर्धेत सहभागी होणार आहेत. बीसीसीआयने १२ आणि १३ फेब्रुवारीला आगामी आयपीएल हंगामासाठी मेगा लिलाव (IPL mega auction) आयोजित केला होता. लिलावानंतर आता अनेक खेळाडू नवीन संघासोबत खेळताना दिसणार आहेत. दरम्यान, धक्कादायक गोष्ट म्हणजे सुरेश रैनाला कोणत्याच संघाने यावर्षी विकत घेतले नाही आणि सीएसकेनेही त्याच्यावर बोली लावली नाही. त्यामुळे रैना आणि एमएस धोनीची जोडी आता चाहत्यांना मैदानात दिसणार नाही.
रैना आणि धोनीची जोडी तुटल्यामुळे चेन्नई सुपर किंग्जचे चाहते निराश झाले आहेत. चेन्नईच्या चाहत्यांप्रमाणेच इतरही काही संघाचे चाहते आहेत, जे त्यांच्या आवडत्या खेळाडूंना आता एकत्र खेळताना पाहू शकणार नाहीत. आगामी हंगामात विराट कोहली आणि एबी डिविलियर्स ही जोडीही एकत्र खेळताना दिसणार नाही. त्याव्यतिरिक्त कृणाल आणि हार्दिक हे पांड्या बंधू आता वेगवेगळ्या संघाकडून खेळतील. तसेच राशिद खान आणि डेविड वॉर्नरही आता वेगवेगळ्या संघात सहभागी झाले आहेत.
आपण या लेखात खेळाडूंच्या अशाच जोड्यांबद्दल जाणून घेणार, ज्या पुढच्या हंगामात एकत्र खेळताना दिसणार नाहीत.
एमएस धोनी आणि सुरेश रैनाची १२ वर्षांची भागीदारी तुटली
चेन्नई सुपर किंग्जसाठी सुरेश रैना आणि एमएस धोनी १२ वर्ष एकत्र खेळले आहेत. या दोघांची जोडी चाहत्यांच्या पसंतीची आहे. परंतु आगामी आयपीएल हंगामात ते एकत्र खेळताना दिसणार नाहीत. चेन्नईने पुढच्या हंगामासाठी सुरेश रैनाला रिटेन केले नव्हते आणि मेगा लिलावात देखील संघाने त्याच्यावर बोली लावली नाही. चेन्नईव्यतिरिक्त इतर कोणत्याही संघाने रैनाला खरेदी करण्याचे धाडस दाखवले नाही.
धोनी आयपीएलच्या इतिसाहातील दुसरा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वात चेन्नईने चार वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. धोनीच्या या कामगिरीमध्ये सुरेश रैनाचेही मोलाचे योगदान राहिले आहे. परंतु, आता भविष्यात रैना कधी आयपीएलमध्ये खेळाडूच्या रूपात पुनरागमन करेल, याची खूपच कमी अपेक्षा आहे. चेन्नईच्या चाहत्यांना रैना आणि धोनी खेळपट्टीवर एकत्र फलंदाजी करताना आता कधीच दिसणार नाहीत.
विराट कोहली आणि एबी डिविलियर्सही ११ वर्षांपासून खेळत होते एकत्र
दक्षिण अफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिविलिययर्स आणि भारताचा माजी कर्णधार विराट कोहली यांची जोडीही चाहत्यांना पुन्हा कधीच एकत्र दिसणार नाही. हे दोघे मागच्या ११ वर्षांपासून रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसाठी एकत्र खेळत आले होते. यादरम्यान दोघांनी अनेकदा मोठ्या भागीदाऱ्या रचल्या. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी २१५ धावांची भागीदारीही या दोघांनीच केली होती. याव्यतिरिक्त आयपीएलमधील अनेक विक्रम या दोघांच्या नावावर आहेत.
परंतु, मागच्या वर्षी डिविलियर्सने अचानक क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्तीची घोषणा केल्यामुळे तो यावर्षी आरसीबीचे प्रतिनिधित्व करताना दिसणार नाही. विराटनेही मागच्या आयपीएल हंगामादरम्यान मोठा निर्णय घेत चाहत्यांना हैराण केले. विराट आगामी आयपीएल हंगामापासून आरसीबीचे नेतृत्व करणार नाही. अशात चाहत्यांंना वेगवेगळ्या देशांच्या या दोन दिग्गज कर्णधारांना एकत्र खेळपट्टीवर फलंदाजी करताना पाहता येणार नाही.
हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या असतील आमने सामने
नेहमी एकत्र खेळताना दिसणारे हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या आगामी आयपीएल हंगामात मात्र एकमेकांच्या विरोधात खेळताना दिसणार आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये बडोदा संघासाठी ते एकत्र खेळले आहेत. त्यानंतर त्यांनी मुंबई इंडियन्स आणि भारतीय संघाचेही प्रतिनिधित्त्व एकत्रच केले. परंतु, आगामी आयपीएल हंगामात मात्र चाहत्यांना या दोघांना एकत्र खेळताना पाहता येणार नाही.
आयपीएल २०२२ मध्ये कृणाल पांड्या लखनऊ सुपर जायंट्ससाठी खेळणार आहे, तर हार्दिक पांड्या गुजरात टायटन्सचा कर्णधार असणार आहे. या दोघांनी त्याच्या कारकिर्दीच्या थोड्या काळामध्येच अनेक विक्रम केले. यादरम्यान त्यांनी अनेक भागीदाऱ्याही केल्या आहेत. दोघांनी मुंबई इंडियन्सला अनेक सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला आहे.
डेविड वॉर्नर आणि राशिद खान यांची जोडी फुटली
ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेविड वॉर्नर आणि अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खान यांनी आयपीएल फ्रेंचायझी सनरायझर्स हैदराबादसाठी अनेक सामने एकत्र खेळले. मागच्या पाच वर्षांपासून हे दोघे दिग्गज हैदराबाद संघासाठी एकत्र खेळत आले होते, पण आगामी हंगामात मात्र दोघे वेगवेगळ्या संघाकडून खेळताना दिसणार आहेत. राशिद खान आता गुजरात टायटन्सचा खेळाडू बनला आहे, तर वॉर्नरने पुन्हा एकदा दिल्ली कॅपिटल्समध्ये पुनरागमन केले आहे.
वॉर्नरच्या नेतृत्वात हैदराबादसाठी खेळताना राशिदला स्वतःला सिद्ध करण्यासाठी संधी मिळाली. त्याने स्वतःच्या गोलंदाजीने कर्णधार आणि चाहत्यांना कधीच निराश केले नाही. आता वॉर्नर हैदराबासाठी नेतृत्व करताना दिसणार नाही, तर संघाचा सर्वात विश्वसनीय गोलंदाज राशिदही संघासोबत नसणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
राजस्थान रॉयल्सने भारतीय खेळाडूंवर दाखवला विश्वास, तर जोफ्रा आर्चरला सोडले, कारण घ्या जाणून
चौथ्या सांघिक आंतर क्लब टेनिस स्पर्धेत डेक्कन चार्जर्स, टायगर्स, एफसी मेटालिका संघांचे विजय
विजयी पुनरागमनासह केरला ब्लास्टर्स ‘टॉप फोर’मध्ये