आयपीएल २०२२ स्पर्धेसाठीचा लिलाव सोहळा (Ipl mega auction) संपन्न झाला आहे. १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या या लिलाव सोहळ्यात अनेक खेळाडूंवर कोट्यवधी रुपयांची बोली लागली. तर काही दिग्गज खेळाडू अनसोल्ड राहिले आहेत. या लिलावात एकूण ६०० खेळाडूंवर बोली लागली. यापैकी २०४ खेळाडूंवर बोली लागली. तर उर्वरित खेळाडू अनसोल्ड राहिले. या खेळाडूंमध्ये काही दिग्गजांचा देखील समावेश होता, जे आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून खेळत होते. परंतु आगामी हंगामात खेळताना दिसून येणार नाहीये.
१) धवल कुलकर्णी (Dhawal Kulkarni) :
वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णीला भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाली नाही. परंतु पहिल्या हंगामापासून तो आयपीएल स्पर्धेत खेळताना दिसून येत आहे. त्याने आतापर्यंत मुंबई इंडियन्स , राजस्थान रॉयल्स आणि गुजरात लायन्स संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. यावेळी देखील त्याने लिलावात सहभाग घेतला होता. त्याची मूळ किंमत ७५ लाख रुपये इतकी होती. परंतु कुठल्याही संघाने त्याला आपल्या संघात घेण्यासाठी बोली लावली नाही. त्याने आतापर्यंत एकूण ९२ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याला ८६ गडी बाद करण्यात यश आले होते.
२) पियूष चावला (Piyush Chawla):
भारतीय संघाचा दिग्गज फिरकी गोलंदाज पियूष चावलाने काही वर्षांपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम केले होते. पियूष चावलाने देखील पहिल्या हंगामापासून या स्पर्धेचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने सुरुवातीला पंजाब संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर त्याला मुंबई आणि चेन्नई संघाचे प्रतिनिधित्व करण्याची देखील संधी मिळाली. परंतु नुकताच संपन्न झालेल्या हंगामात त्याला खरिददार मिळाला नाही. त्यामुळे आगामी हंगामात तो खेळताना दिसून येत नाहीये. त्याने या स्पर्धेत आतापर्यंत एकूण १६५ सामने खेळले ज्यामध्ये त्याला १५७ गडी बाद करण्यात यश आले होते.
३) एबी डीविलियर्स (Ab devilliers) :
दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज एबी डीविलियर्स याने काही महिन्यांपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम केले होते. तो आयपीएल स्पर्धेतील विस्फोटक फलंदाजांपैकी एक आहे. पहिल्या हंगामापासून तो या स्पर्धेचे प्रतिनिधित्व करतोय. २००८ मध्ये पार पडलेल्या पहिल्या हंगामात त्याने दिल्ली संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर २०११ मध्ये तो रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात आला. तेव्हापासून तो याच संघात खेळत होता. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटसह आयपीएल स्पर्धा देखील न खेळण्याचा निर्णय घेतला होता. हेच कारण आहे की, तो आगामी हंगामात खेळताना दिसून येणार नाहीये.
४) अमित मिश्रा (Amit mishra) :
भारतीय संघाचा दिग्गज फिरकीपटू अमित मिश्रा हा मैदानावर असताना किती पराक्रम करू शकतो हे आपण सर्वांनी पाहिलं आहे. जरी त्याला भारतीय संघाकडून जास्त सामने खेळण्याची संधी मिळाली नाही. तरीदेखील त्याने आयपीएल स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली आहे. त्याने देखील पहिल्या हंगांमापासून या स्पर्धेचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने १५४ सामन्यात एकूण १६६ गडी बाद केले आहेत. यावेळी देखील आयपीएल लिलावात सहभाग घेतला होता. परंतु कुठल्याही संघमालकाने त्याच्यासाठी बोली लावली नाही. परिणामी तो अनसोल्ड राहिला.
महत्वाच्या बातम्या :
“आज बाबांना खूप आनंद झाला असता”; ‘उस्मानाबाद एक्सप्रेस’ राजवर्धन झाला भावूक
‘रेकॉर्डतोड’ चौदा कोटींची बोली लागूनही दीपक चहर नाराज; म्हणाला, “ती इच्छा राहिली अपूर्ण”
मुंबई इंडियन्समध्ये सामील होताच अर्जुन तेंडुलकर खुश, तर बहीण साराने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया