काय तो गोलंदाज, काय ते षटक आणि काय त्या विकेट्स… आयपीएल 2023 स्पर्धेतील एलिमिनेटर सामन्यात आकाश मधवाल याची शानदार गोलंदाजी पाहणारा प्रत्येक क्रिकेटप्रेमी कदाचित असेच म्हणत असेल. लखनऊ सुपर जायंट्स वि. मुंबई इंडियन्स संघ बुधवारी (दि. 24 मे) चेन्नईच्या चेपॉक स्टेडिअमवर आमने-सामने होते. या सामन्यात आकाशने कमी धावा कर्च करत सर्वाधिक विकेट्स घेत खास विक्रम रचला. तसेच, मुंबईला तब्बल 81 धावांनी सामना जिंकून दिला. यामुळे मुंबईने थेट क्वालिफायर 2 सामन्यात एन्ट्री केली. या विजयाचा नायक 29 वर्षीय आकाश मधवाल ठरला. त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
मुंबई इंडियन्स संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 8 विकेट्स गमावत 182 धावा केल्या होत्या. यामध्ये कॅमरून ग्रीन याचे सर्वाधिक योगदान होते. त्याने 41 धावांची खेळी साकारली. त्याने सूर्यकुमार यादव (33) याच्यासोबत तिसऱ्या विकेटसाठी 38 चेंडूत 66 धावांची भागीदारी रचली होती. या आव्हानाचा पाठलाग करताना लखनऊ संघाचा डाव 16.3 षटकात 101 धावांवर पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला.
आकाश मधवालची शानदार गोलंदाजी
मुंबईच्या 182 धावांचा पाठलाग करताना लखनऊ संघाची सुरुवात खूपच खराब झाली. त्यांनी 4 षटकांच्या आत काईल मेयर्स आणि प्रेरक मांकड यांच्या विकेट्स गमावल्या. आकाशने आपल्या पहिल्याच षटकात मांकडला बाद केले. या षटकात त्याने 2 धावा खर्च करत ही कामगिरी केली. त्यानंतर आकाश त्याचे दुसरे षटक टाकण्यासाठी डावातील 10व्या षटकात गोलंदाजीला आला. त्याने यावेळी चौथ्या चेंडूवर आयुष बदोनी याची विकेट घेतली. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर विस्फोटक फलंदाज निकोलस पूरन याला शून्यावर तंबूचा रस्ता दाखवला. त्याने 2 चेंडूत 2 मोठ्या विकेट्स घेत लखनऊच्या फलंदाजी फळीचं कंबरडं मोडलं. बदोनी त्रिफळाचीत बाद झाला, तर पूरन यष्टीमागे झेलबाद झाला. या षटकात त्याने 1 धाव खर्च करत 2 विकेट्स नावावर केल्या. यावेळी आकाशच्या 3 विकेट्स पूर्ण झाल्या.
त्यानंतर आकाशने आपल्या तिसऱ्या आणि डावातील 15व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर रवी बिश्नोई याला ख्रिस जॉर्डन याच्या हातून झेलबाद करत आपली चौथी विकेट पूर्ण केली. या षटकात त्याने 2 धावा खर्च केल्या. यानंतर आकाश डावातील 17वे आणि आपले चौथे षटक टाकण्यासाठी आला. यावेळी लखनऊने 16 षटकांनंतर 9 बाद 100 धावा केल्या होत्या. यावेळी आकाशने पहिला चेंडू नवीन उल हक याला टाकला. तो चेंडू निर्धाव राहिला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर नवीनने एक धाव घेतली आणि मोहसिन खान स्ट्राईकवर आला.
मोहसिन स्ट्राईकवर असताना आकाशने तिसरा चेंडू टाकला आणि त्याला त्रिफळाचीत करत तंबूचा रस्ता दाखवला. यासह आकाशने आपल्या 5 विकेट्स पूर्ण केल्या. आकाशने या सामन्यात 3.3 षटके गोलंदाजी करताना फक्त 5 धावा खर्च करत 5 विकेट्स नावावर केल्या. तो आयपीएल इतिहासात सर्वोत्तम गोलंदाजी करणारा तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज ठरला. त्याच्याआधी अल्झारी जोसेफ याने मुंबईसाठीच 12 धावा खर्च करत 6 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच, दुसऱ्या स्थानी असलेल्या सोहेल तन्वीर याने 14 धावा खर्च करत 6 विकेट्स घेतल्या होत्या.
विशेष म्हणजे, आकाशने मागील सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध 37 धावा खर्च करत 4 विकेट्स घेतल्या होत्या.
कोण आहे आकाश मधवाल?
आकाश मधवाल हा उत्तराखंडच्या रुडकी येथील रहिवासी आहे. तो उत्तराखंडकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. त्याने इंजीनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे, पण त्याला क्रिकेटची आवड आहे. त्याचे रिषभ पंत याच्याशी जवळचे नाते आहे. खरं तर, दोघेही शेजारी आहेत. रुडकीच्या ढंडेरा येथे राहणारा मधवाल हा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) याच्या घराच्या समोरच राहतो. एवढेच नाही, तर पंत आणि आकाश यांचे प्रशिक्षकही एकच राहिले आहेत. आकाशने अवतार सिंग यांच्या प्रशिक्षणाखाली क्रिकेटचे धडे गिरवले आहेत. अवतार सिंग यांनी पंतलाही प्रशिक्षण दिले आहे. (ipl 2023 cricketer akash madhwal turned the match by taking back to back wickets know what is the connection with rishabh pant read here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हुड्डाने पकडला तिलक वर्माचा खतरनाक कॅच, तरीही नवीन रागाने झाला लाल; रिऍक्शन व्हिडिओत कैद
अर्रर्र! नवीनच्या माऱ्यापुढे विस्फोटक सूर्या-ग्रीनने टेकले गुडघे, एकाच ओव्हरमध्ये मुंबईचा खेळ खल्लास