आयपीएल 2024 च्या 20व्या सामन्यात मुंबई इंडियन्सनं दिल्ली कॅपिटल्सचा 29 धावांनी पराभव केला. दिल्ली कॅपिटल्ससमोर विजयासाठी 235 धावांचे लक्ष्य होते. परंतु ऋषभ पंतच्या संघाला 20 षटकात 8 गडी गमावून 205 धावाच करता आल्या.
या पराभवानंतर दिल्ली कॅपिटल्सच्या प्लेऑफच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. वास्तविक, आता दिल्ली कॅपिटल्सचे 5 सामन्यांत केवळ 2 गुण आहेत. म्हणजेच संघाला 4 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागलाय. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या पराभवानंतर दिल्ली कॅपिटल्सचा संघ गुणतालिकेत तळाच्या स्थानी घसरला आहे.
मुंबईविरुद्ध पराभवाचं सर्वात मोठं कारण म्हणजे, दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांनी शेवटच्या षटकांमध्ये खूप धावा दिल्या. टीम डेव्हिड आणि रोमॅरियो शेफर्ड यांनी शेवटच्या 36 चेंडूत 96 धावा ठोकल्या. यामुळेच हार्दिक पांड्याचा संघ 20 षटकांत 234 धावांपर्यंत मजल मारण्यात यशस्वी ठरला. एनरिक नॉर्कियाच्या शेवटच्या षटकात रोमॅरियो शेफर्डनं 32 धावा ठोकल्या. याशिवाय इशांत शर्मा आणि जे रिचर्डसनसह अन्य गोलंदाजांनीही निराशा केली. विशेषत: डेथ ओव्हर्समध्ये दिल्ली कॅपिटल्सचे गोलंदाज असहाय्य दिसत होते.
मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सचे सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि पृथ्वी शॉ पॉवरप्लेमध्ये झटपट धावा जोडू शकले नाहीत. विशेषत: डेव्हिड वॉर्नरनं 8 चेंडूत 10 धावा करून बाद झाला. पृथ्वी शॉनं 40 चेंडूत 66 धावा केल्या, मात्र सुरुवातीच्या षटकांमध्ये तो संघर्ष करताना दिसला. त्यामुळे संघाला वेगवान सुरुवात करता आली नाही.
दिल्लीसाठी अभिषेक पोरेलनं 31 चेंडूत 41 धावा केल्या, पण 235 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना तो अधिक चांगल्या स्ट्राईक रेटनं फलंदाजी करू शकला असता. याशिवाय ऋषभ पंत आणि अक्षर पटेलसारख्या फलंदाजांनीही निराशा केली. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सला पराभवाचा सामना करावा लागला.
मुंबई इंडियन्सचा आयपीएल 2024 मधील हा पहिला विजय आहे. यासह ते 4 सामन्यांमध्ये 2 गुणांसह गुणतालिकेत 8व्या स्थानी पोहचले आहेत. तर पाच सामन्यांत 4 पराभवानंतर दिल्ली कॅपिटल्सचा संघ गुणतालिकेत तळाशी गेला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
अक्षर पटेलचा अशक्यप्राय झेल! इशान किशनचा विश्वासच बसेना; पाहा VIDEO
हार्दिक पांड्यानं अखेर विजयाची चव चाखली! दिल्लीचा 29 धावांनी पराभव
आयपीएलमध्ये 49 धावांवर सर्वाधिक वेळा बाद होणारा फलंदाज, रोहित शर्माच्या नावे नकोसा रेकॉर्ड