रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं आयपीएल 2024 च्या प्लेऑफमध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. 18 मे (शनिवार) रोजी एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या नॉकआउट सामन्यात आरसीबीनं चेन्नई सुपर किंग्जचा 27 धावांनी पराभव केला. आता, 22 मे (बुधवार) रोजी होणाऱ्या एलिमिनेटर सामन्यात आरसीबीचा सामना पॉइंट टेबलमधील तिसऱ्या क्रमांकावरील संघाशी (सनरायझर्स हैदराबाद किंवा राजस्थान रॉयल्स) होईल.
15 दिवसांपूर्वी आरसीबी प्लेऑफमध्ये पोहोचेल याची कल्पनाही कोणी केली नसेल. खरं तर, एकेकाळी 8 सामन्यांत फक्त एका विजयासह आरसीबीचे केवळ दोन गुण होते. संघानं सलग 6 सामने गमावले होते. त्यानंतर पॉइंट टेबलमध्ये आरसीबी शेवटच्या स्थानावर राहील असं वाटत होते. त्यावेळी संघाचं मनोबलही खचलं होते. परंतु त्यानंतर जे घडलं ते इतिहासाच्या पानात नोंदवलं गेलं आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं दमदार पुनरागमन करत विजयाचा ‘षटकार’ मारलाच, पण प्लेऑफमध्येही प्रवेश केला. पहिल्या सात सामन्यांमध्ये केवळ एक सामना जिंकूनही प्लेऑफमध्ये पोहोचणारा आरसीबी पहिला संघ ठरला आहे. संघाच्या या कमबॅकमध्ये कोणत्या 5 खेळाडूंनी महत्त्वाची भूमिका बजावली, हे आम्ही तुम्हाला या बातमीद्वारे सांगणार आहोत.
विराट कोहली – विराट कोहलीनं या हंगामात आरसीबीसाठी सातत्यानं चांगली कामगिरी केली आहे. या मोसमात कोहली आरसीबीचा स्टार परफॉर्मर राहिला. कोहलीनं आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत 14 सामन्यांमध्ये 708 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याचा स्ट्राइक रेट 155.60 आणि सरासरी 64.36 राहिली. कोहलीनं चालू हंगामात 5 अर्धशतकं आणि 1 शतक झळकावलं आहे. सध्या ‘ऑरेंज कॅप’ किंग कोहलीकडेच आहे.
कॅमरून ग्रीन – मागील आयपीएल हंगामात कॅमरून ग्रीन हा मुंबई इंडियन्सचा भाग होता. या हंगामात आरसीबीनं त्याला ट्रेडिंग विंडोद्वारे आपल्या संघात समाविष्ट केलं. सुरुवातीच्या सामन्यांमध्ये ग्रीन फ्लॉप ठरला होता. पण त्यानंतर तो फॉर्ममध्ये आला. ग्रीननं फलंदाजीसह गोलंदाजीतही उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यानं 12 सामन्यात 222 धावा केल्या. गोलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर ग्रीनच्या नावावर 9 विकेट आहेत. याशिवाय त्यानं आपल्या क्षेत्ररक्षणाद्वारेही काही सामन्यांची दिशा बदलली आहे.
फाफ डू प्लेसिस – संघाच्या यशात कर्णधाराची भूमिका महत्त्वाची असते. कर्णधारानं पुढे येऊन नेतृत्व केलं की संघाचं नशीब बदलायला वेळ लागत नाही. फॅफ डू प्लेसिस चाहत्यांच्या अपेक्षांवर खरा उतरला आहे. कर्णधारपदासह फलंदाजीतही तो चमकदार कामगिरी करत आहे. या हंगामात डू प्लेसिसनं 14 डावात 30.07 च्या सरासरीनं 420 धावा ठोकल्या. सीएसके विरुद्धच्या शेवटच्या सामन्यात डू प्लेसिसनं 54 धावांची तुफानी खेळी खेळली, ज्यामुळे मोठ्या धावसंख्येचा पाया रचला गेला.
विल जॅक्स – विल जॅक्सनं आरसीबीचं नशीब बदलवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सुरुवातीच्या सामन्यांमध्ये जॅक्सला संधी मिळाली नाही. मात्र संधी मिळाल्यानंतर त्यानं अतुलनीय कामगिरी केली. जॅक्सनं गुजरात टायटन्सविरुद्ध शानदार शतक झळकावलं, ज्यामुळे आरसीबीला स्पर्धेत कमबॅक करण्याचं बळ मिळालं. त्यानंतर जॅक्सनं दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 41 धावांची खेळी खेळली. जॅक्स सीएसकेविरुद्धच्या सामन्यात खेळला नाही कारण तो पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी इंग्लंडला परतला आहे. आयपीएलच्या आपल्या या पहिल्या हंगामात त्यानं 8 सामन्यांमध्ये 175.57 च्या स्ट्राइक रेटनं 230 धावा केल्या.
यश दयाल – डावखुरा वेगवान गोलंदाज यश दयालनं आरसीबीसाठी या हंगामात चमकदार कामगिरी केली आहे. दयालनं आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत 13 सामन्यांत 8.94 च्या इकॉनॉमी रेटनं 15 विकेट घेतल्या. चेन्नई विरुद्धच्या सामन्यातील शेवटचं षटक यश दयालनं टाकले होतं. या षटकात त्यानं 17 धावांचा बचाव करत महेंद्रसिंह धोनीची विकेट घेतली होती. ज्यामुळे आरसीबी प्लेऑफसाठी क्वॉलिफाय झाली.
महत्त्वाच्या बातम्या –
आरसीबी प्लेऑफसाठी पात्र ठरल्यानंतर विजय माल्ल्यांची प्रतिक्रिया व्हायरल, खास ट्विट करून म्हणाले…