आयपीएलमध्ये आज (शनिवार, 3 ऑक्टोबर) दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना होणार आहे. या उभय संघातील हा सामना यूएईतील शारजाह येथे खेळवला जाणार आहे. फलंदाजांसाठी नंदनवन समजल्या जाणाऱ्या शारजाहच्या मैदानावर गोलंदाजी करताना खेळाडूंची कसोटी लागेल, यात शंका नाही.
चौफेर फटकेबाजीसाठी शारजाहचं मैदान पूरक…
यूएईतील इतर मैदानांच्या तुलनेत शारजाह येथील मैदान लहान आहे. या मैदानात आतापर्यंत खेळल्या गेलेल्या आयपीएलच्या या हंगामातील मागील दोन्ही सामन्यात एका डावात सरासरी 200 धावा कुटल्या गेल्या आहेत. त्यामुळे दिल्ली आणि कोलकाता यांच्यातील सामन्यातही मोठी धावसंख्या उभारली जाईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
दिल्ली-कोलकाताकडे फलंदाजांची चांगली फळी –
या सामन्यात दिल्लीचा युवा फलंदाज रिषभ पंत याच्यावर आज दबाव असेल; कारण त्याने या हंगामात अद्याप चांगली कामगिरी केलेली नाही. पंत शिवाय दिल्ली संघात शिखर धवन, श्रेयस अय्यर, मार्कस स्टॉयनीस, पृथ्वी शॉ,शिमरॉन हेटमायर असे धूंवाधार फलंदाजी करणारे फलंदाज आहेत. पण याशिवाय आज अजिंक्य रहाणेला संधी मिळते का हे पाहावे लागले. कारण त्याला अजून एकदाही दिल्लीकडून अंतिम 11 जणांच्या संघात संधी मिळालेली नाही.
तसेच केकेआरकडे शुबमन गिल, आंद्रे रसल आणि ऑएन मॉर्गनसारखे फलंदाज असतील. हे सर्व खेळाडू मोठे फटके खेळण्यात पटाईत आहेत. विशेष म्हणजे शारजाहच्या या मैदानावर आतापर्यंत झालेल्या दोन सामन्यातच 62 षटकार ठोकले गेले आहेत. त्यामुळे दोन्ही संघातील फलंदाजांसाठी ही आनंदाची गोष्ट आहे.
युवा गोलंदाजांची असेल कसोटी
मागील सामन्यात केकेआरचा युवा वेगवान गोलंदाज कमलेश नागरकोटी आणि शिवम मावी यांनी चांगली कामगिरी बजावली होती. परंतु या मैदानात त्यांची खरी कसोटी असेल कारण हे मैदान फलंदाजीसाठी अनुकूल आहे. पहिल्या तीन सामन्यात सुनील नरेन सलामीवीर म्हणून अपयशी ठरला आहे. त्याने केवळ 24 धावा केल्या आहे. पण केकेआर कदाचित त्यांच्या संघात बदल करणार नाही. नरेनने मात्र नेहमीप्रमाणे गोलंदाजीत आपली छाप सोडली आहे.
विस्फोटक फलंदाज टॉम बँटनच्या रूपात संघात राखीव सलामीवीर आहे. परंतु शारजाहच्या मैदानात केकेआर नरेनला अव्वल क्रमांकावर संधी देईल असे वाटते.
कुलदीपकडे असेल लक्ष
भारतीय संघातील गोलंदाज इशांत शर्मा, अमित मिश्रा, अक्षर पटेल दिल्ली संघाकडून चांगली गोलंदाजी करत आहेत, पण शारजाहमध्ये त्यांची परीक्षा असेल. अशा परिस्थितीत गोलंदाजी प्रशिक्षक रायन हॅरिसचीही जबाबदारी वाढली आहे.
तसेच दिल्लीकडे चांगले फलंदाज असले तरी त्यांना कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती सारख्या फिरकी गोलंदाजांना सामोरे जावे लागेल. एवढेच नाही तर केकेआरकडे पॅट कमिन्स सारखा अनुभवी वेगवान गोलंदाजही आहे आणि त्यांची गोलंदाजी युवा प्रतिभावान गोलंदाजांवरही अवलंबून आहे. त्यामुळे कोलकाताच्या गोलंदाजीला कमी समजून दिल्लीला चालणार नाही.