भारतात सध्या कोरोना विषाणूचे थैमान सुरू आहे. दिवसेंदिवस भारतातील कोरोना रूग्णसंख्या वाढतेच आहे आणि त्यामुळे देशातील आरोग्य सुविधांवर ताण वाढतो आहे. अशा परिस्थितीत सगळया क्षेत्रांमधून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. क्रिकेटपटू देखील यात मागे नाहीत. अनेक भारतीय आणि विदेशी क्रिकेटपटूंनी देशाला भरभरून मदत केली आहे.
यातच आता भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने एक मोठी घोषणा केली आहे. त्याने सोशल मीडिया कॅम्पेन मधून मिळणारी सगळी मदत कोरोना विरोधी लढ्यासाठी दान करण्याचे जाहीर केले आहे.
पठाण बंधूंची मोठी मदत
इरफान पठाणने सोशल मीडिया कॅम्पेन मधून मिळणारी संपूर्ण म्हणजेच १०० टक्के रक्कम कोरोनासाठी दान करण्याचा निर्णय घेतला आहे. इरफान आणि युसूफ या पठाण बंधूंनी कच्चा माल देखील दान केला आहे. तसेच आत्तापर्यंत ९०,००० कुटुंबांना मदत केली आहे. इतकेच नाही तर पठाण क्रिकेट अकादमी तर्फे दक्षिण दिल्लीतील कोरोना बाधित लोकांना मोफत भोजनाची व्यवस्था देखील करण्यात आली. त्यांचे वडील देखील एका सामाजिक संस्थेद्वारे कोरोना रुग्णांना मोफत भोजन उपलब्ध करून देत आहेत.
मागील वर्षी देखील पठाण बंधूंनी केली होती मदत
मागील वर्षी भारतात कोरोनाच्या पहिल्या लाटेने हाहाकार माजला होता. त्यावेळी देखील पठाण बंधू मदतीसाठी पुढे सरसावले होते. गरजूंना भोजन उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांनी ४००० मास्कचे वाटप केले होते. याशिवाय वडोदरा पोलिसांना त्यांनी प्रतिकारशक्ती वाढवणार्या व्हिटॅमिन गोळ्या देखील वाटल्या होत्या.
पठाण बंधूंनी केवळ कोरोनाच नाही तर इतर संकटात देखील यापूर्वी मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. २०१८ साली केरळ मध्ये पूरग्रस्तांसाठी त्यांनी मदतीचा हात पुढे केला होता. पुराने बाधित लोकांना त्यांनी आवश्यक सामान पुरवण्याचे काम केले होते. इरफान आणि युसूफ या दोघांनाही प्रत्यक्ष भाग घेत हे मदतकार्य केले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
तुम्हीच पैसे का देत नाही?, असा प्रश्न विचारत ट्रोल करण्याऱ्याला हनुमा विहारीने चांगलेच खडसावले
कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी उत्सुक नसल्याच्या अफवेवर भुवनेश्वर संतापला, ट्विट करत सुनावले खडे बोल
तब्बल अडीच वर्षांनी बॉल टेम्परिंग प्रकरणाबाबत कॅमेरून बेनक्रॉफ्टने केला मोठा खुलासा, म्हणाला..