भारत विरुद्ध इंग्लंड संघात चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर पहिल्या कसोटी सामन्याची रंगतदार लढत चालू आहे. इंग्लंडच्या पहिल्या डावातील ५७९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा पहिला डाव ३३७ धावांवर संपुष्टात आला. यामुळे पहिल्या डावात पाहुण्यांनी २४२ धावांनी आघाडी घेतली. यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी मैदानावर उतरलेल्या इंग्लंडला भारतीय गोलंदाजांनी एका-नंतर-एक धक्के दिले. त्यातही भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्मा याने या डावातील आपली पहिली विकेट घेत खास विक्रमाला गवसणी घातली आहे.
इशांतने इंग्लंडचा विस्फोटक फलंदाज डॅनियल लॉरेन्स याला १८ धावांवर पायचित केले. अशाप्रकारे लॉरेन्सला बाद करत इशांतने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील ३०० विकेट्सचा आकडा पूर्ण केला आहे.
या सामन्यापुर्वी इशांतने ९७ कसोटी सामन्यातील १७५ डावात गोलंदाजी करताना २९७ विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे त्याला कसोटी कारकिर्दीतील ३०० विकेट्सचा टप्पा गाठण्यासाठी अवघ्या ३ विकेट्सची गरज होती. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात त्याने २ फलंदाजांना बाद केले. यात जोस बटलर आणि जोफ्रा आर्चर यांचा समावेश आहे. त्यानंतर नुकतीच दुसऱ्या डावात लॉरेन्सची तिसरी विकेट घेत त्याने ३०० विकेट्स पूर्ण केल्या आहेत.
यासह इशांत भारताकडून कसोटीत ३०० विकेट्स घेणारा सहावा गोलंदाज ठरला आहे. त्याच्यापुर्वी अनिल कुंबळे, कपिल देव, हरभजन सिंग, आर अश्विन आणि झहीर खान यांनी ही खास कामगिरी केली आहे.
३०० आणि त्यापेक्षा जास्त कसोटी विकेट्स घेणारे भारतीय
६१९ विकेट्स- अनिल कुंबळे
४३४ विकेट्स- कपिल देव
४१७ विकेट्स- हरभजन सिंग
३८२ विकेट्स- आर अश्विन
३११ विकेट्स- झहीर खान
३०० विकेट्स- इशांत शर्मा
महत्त्वाच्या बातम्या-
अश्विनने पहिल्या चेंडूवर दिला इंग्लंडला धक्का, ठरला शानदार किर्तीमान करणारा पहिला भारतीय
कॅच, कॅच अन् नुसते कॅच! चेन्नई कसोटीत पाहुण्यांच्या हातून भारताचा अख्खा संघ झेलबाद






