fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

ISL 2018-19: पुढच्या हंगामातही मुंबई सिटी एफसीच्या प्रशिक्षकपदी होर्गे कोस्टा 

मुंबई: यंदाच्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) स्पर्धेत मुंबई सिटी एफसी संघाने चमक दाखवत उपांत्यफेरीपर्यंत मजल मारली होती. पोर्तुगीजचे अनुभवी होर्गे कोस्टाच्या मार्गदर्शनाखाली मुंबई सिटी एफसीला ही कामगिरी करता आली. त्यांनी देखील संघाला जेतेपद मिळवून देण्याच्या इराद्याने पुढील वर्षीही संघासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई सिटी एफसी सोबतच्या आपल्या पहिल्या हंगामात  कोस्टाने आक्रमक फुटबॉलचे प्रदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने चांगली कामगिरी करत हंगामात सलग नऊ सामन्यांमध्ये विजय मिळवत चमक दाखवली. त्यांनी गुणतालिकेत तळावरून उपांत्यफेरीत पोहोचण्यापूर्वी दुसरे स्थान मिळवले होते. क्लबच्या इतिहासात असे दुसऱ्यांदाच घडले आहे. बाद फेरीतील सामन्यात त्यांनी एफसी गोवा विरुद्ध विजय मिळवला पण, गोल फरकाच्या अंतराने अंतिम सामन्यात त्यांना पोहोचता आले नाही. आपल्या करार वाढीवर सही करताना आपण लगेचच तयारी दर्शवल्याचे 46 वर्षीय प्रशिक्षकाने सांगितले.
क्लब मधील माझ्या पहिल्या दिवसापासून मला व्यवस्थापन व स्टाफकडून खूप चांगले अनुभव मिळाले आहेत. मला माझे काम चांगल्या पद्धतीने करता यावे याकरता मुंबई सिटी एफसीच्या सर्वांनी मला मदत केली. आम्ही उपांत्यफेरीपर्यंत पोहचून देखील समाधानी नसलो तरीही हा हंगाम आमच्यासाठी संस्मरणीय राहिला असे कोस्टा म्हणाले.क्लब च्या इथपर्यंतच्या वाटचालीत फॅन्सचा खूप मोठा हात आहे. पुढील हंगामात देखील मुंबई सोबत असल्याने मी आनंदी असून फॅन्सना चांगल्या आठवणी देण्याचा आमचा प्रयत्न असेल असे कोस्टा पुढे म्हणाले.
 पोर्तुगालच्या वरिष्ठ संघासोबत त्यांनी 50 सामन्यांमध्ये सहभाग नोंदवला असून दोन गोल झळकावले आहेत. त्यांनी आपली व्यवस्थापकीय कारकीर्द  एससी ब्रागापासून सुरुवात केली.कोस्टाने 2011-12 साली सीएफआर क्लूज संघाला रोमानियन लीग वन चे जेतेपद मिळवून देण्यात आपले योगदान दिले. यासोबत त्यांनी मुंबईला येण्यापूर्वी सायप्रस, गॅबन आणि फ्रान्स संघाला देखील मार्गदर्शन केले.आता होर्गे यांच्यासमोर हिरो सुपर कपमध्ये भुवनेश्वरच्या कलिंगा स्टेडियममध्ये राऊंड ऑफ 16 मध्ये 29 मार्चला चेन्नईन एफसीचे आव्हान असणार आहे.
You might also like