गोवा| सातव्या हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेत (आयएसएल) बुधवारी थरारक खेळ झालेल्या लढतीत ईस्ट बंगाल आणि एफसी गोवा यांनी 1-1 अशी बरोबरी साधली. पहिल्या सत्रात गोलरक्षक देबजीत मजुमदार याने गोव्याची आक्रमणे फोल ठरवणे, दुसऱ्या सत्रात ईस्ट बंगालच्या एका खेळाडूवर लाल कार्डची नामुष्की येणे, त्यानंतरही ईस्ट बंगालने सनसनाटी गोलमुळे आधी खाते उघडणे आणि मग एफसी गोवाने नवोदित बदली खेळाडूमुळे दोनच मिनिटांत बरोबरी साधणे, अशा घडामोडींमुळे हा सामना रोमहर्षक ठरला.
वास्को येथील टिळक मैदानावर हा सामना झाला. एका तासाच्या खेळापूर्वीच कर्णधार डॅनिएल फॉक्स याला लाल कार्डमुळे मैदान सोडावे लागल्यामुळे ईस्ट बंगालवर दहा खेळाडूंनिशी खेळण्याची वेळ आली. त्यानंतरही ईस्ट बंगालने खाते आधी उघडले. आघाडी फळीतील नायजेरियाचा 22 वर्षीय स्ट्रायकर ब्राईट एनोबाखरे याने 79व्या मिनिटाला सनसनाटी गोलच्या जोरावर ही कामगिरी केली. मग गोव्याने दोन मिनिटांत बरोबरी साधली. आघाडी फळीतील 22 वर्षीय बदली खेळाडू देवेंद्र मुरगावकर याने हा गोल केला.
गोव्याची ही दहा सामन्यांतील तिसरी बरोबरी असून चार विजय व तीन पराभव अशा कामगिरीसह त्यांचे १५ गुण झाले. गुणतक्त्यातील त्यांचे तिसरे स्थान कायम राहिले.
ईस्ट बंगालने 9 सामन्यांत चौथी बरोबरी साधली असून एक विजय व चार पराभव अशा कामगिरीसह त्यांचे सात गुण झाले. त्यांनी केरला ब्लास्टर्सला (8 सामन्यांतून 6 गुण) मागे टाकून एक क्रमांक प्रगती केली. आता ईस्ट बंगालचा नववा क्रमांक आहे.
मुंबई सिटी एफसी 9 सामन्यांतून सात विजयांसह 22 गुण मिळवून आघाडीवर आहे. एटीके मोहन बागानचा दुसरा क्रमांक असून 9 सामन्यांत सहा विजयांसह त्यांच्या खात्यात 20 गुण आहेत. जमशेदपूर एफसी 9 सामन्यांतून 13 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे.
दुसऱ्या सत्रात 56व्या मिनिटाला ईस्ट बंगालचा कर्णधार डॅनिएल फॉक्स याला लाल कार्डला सामोरे जावे लागले. त्याने गोव्याचा मध्यरक्षक रोमारीओ जेसुराज याला पाडले. त्यानंतरही ईस्ट बंगालने हताश न होता जिद्दीने खेळ केला.
गोलरक्षक मजुमदारने लांबून टाकलेला चेंडू बदली मध्यरक्षक जॅक्स मॅघोमा याने ब्राईटच्या दिशेने मारला. ब्राईटने मग गोव्याच्या तीन खेळाडूंना चकवताना थरारक कौशल्य प्रदर्शित केले. मग त्याने गोव्याचा गोलरक्षक महंमद नवाझ यालाही हुलकावणी दिली.
बदली स्ट्रायकर देवेंद्रने गोव्याला दोन मिनिटांत बरोबरी साधून दिली. बचावपटू सेव्हियर गामा याने क्रॉस शॉटवर निर्माण केलेल्या संधीनंतर त्याने हेडिंगवर शानदार फिनिशींग केले. त्यावेळी मजुमदार अखेर चकला. ही चाल डावीकडून रचण्याची कामगिरी मध्यरक्षक जोर्गे मेंडोझा याने केली होती. तोल जाऊनही त्याने गामाला पास दिला होता.
पहिल्या सत्रात चुरशीचा खेळ झाला. तिसऱ्याच मिनिटाला ईस्ट बंगालचा बचावपटू नारायण दासने डावीकडून आगेकूच केली, पण गोव्याचा मध्यरक्षक रोमारीओ जेसुराजने त्याला पाडले. त्यामुळे ईस्ट बंगलला फ्री किक देण्यात आली. स्ट्रायकर ब्राईट एनोबाखारे याने ती घेतली, पण त्याने बॉक्समध्ये फटका मारूनही चेंडू गोव्याचा गोलरक्षक महंमद नवाझ याच्या खूप जवळ आला. त्यामुळे ही संधी वाया गेली.
चौथ्या मिनिटाला गोव्याला फ्री किक मिळाली. त्यांचा मध्यरक्षक जोर्गे मेडोझा ती घेत असतानाच ईस्ट बंगालचा बचावपटू स्कॉट नेव्हील याने त्याला पाडले. त्यामुळे गोव्याला पुन्हा फ्री किक मिळाली. यावेळी मध्यरक्षक ब्रँडन फर्नांडीस याने बॉक्समध्ये अप्रतिम फटका मारला. त्यावर जेम्स डोनाची याने मजुमदार याच्या उजवीकडून चेंडू मारला, पण मजुमदारने चपळाईने झेप टाकत चेंडू अडवला.
त्यानंतर पाचव्या मिनिटाला मिळालेला कॉर्नर घेताना ब्रँडनला सफाईदार फटका मारता आला नाही. त्यामुळे मजुमदार चेंडू आरामात अडवू शकला.
18व्या मिनिटाला मेंडोझाने उजवीकडून मुसंडी मारली. त्याचा क्रॉस शॉट ईस्ट बंगालचा मध्यरक्षक मिलन सिंग याने अडवला.
23व्या मिनिटाला गोव्याला मिळालेला कॉर्नर वाया गेला. मध्यरक्षक एदू बेदिया याने हा कॉर्नर घेताना बचावपटू इव्हान गोंझालेझ याच्यासाठी संधी निर्माण करण्याचा प्रयत्न केला, पण ईस्ट बंगालचा बचावपटू डॅनिएल फॉक्स याने हेडिंगद्वारे चेंडू बाहेर घालवला. त्यामुळे गोव्याला पुन्हा कॉर्नर मिळाला. यावेळी ब्रँडनला अचूक फटका मारता आला नाही. त्यामुळे ईस्ट बंगालच्या बचाव फळीला ही चाल फोल ठरवता आली.
पूर्वार्धाच्या अंतिम टप्प्यात मेंडोझाने चेंडूवर ताबा मिळवित आगेकूच केली. त्याने फटका मारल्यानंतर चेंडू अचानक उसळूनही मजुमदारने उजवीकडे झेप टाकत बचाव केला.
त्यानंतर मजुमदारने संघाला पुन्हा तारले. गोव्याचा बचावपटू सेव्हियर गामा याचा प्रयत्न त्याने अपयशी ठरवला. यावेळीही मजुमदारने झेप टाकत कौशल्याचे प्रदर्शन केले.