भारत व इंग्लंड यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना अहमदाबाद येथे सुरू आहे. दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात इंग्लंडच्या गोलंदाजांनी धारदार गोलंदाजी करत भारतीय फलंदाजांवर अंकुश ठेवला. पहिल्या दिवशी इंग्लंडला पहिले यश मिळवून देणाऱ्या अनुभवी जेम्स अँडरसनने दुसऱ्या दिवशी लंचआधीच्या अखेरच्या षटकात भारतीय उपकर्णधार अजिंक्य रहाणेला बाद करत आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोचला.
अशी कामगिरी करणारा ठरला तिसरा वेगवान गोलंदाज
इंग्लंडचा सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाज असलेला जेम्स अँडरसन भारताविरुद्धच्या अखेरच्या कसोटीत एकमेव वेगवान गोलंदाज म्हणून खेळत आहे. अँडरसनने सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताचा सलामीवीर शुबमन गिलला बाद करत इंग्लंडला पहिले यश मिळवून दिले होते. दुसऱ्या दिवशी लंचआधीच्या अखेरचा षटकात जम बसलेल्या अजिंक्य रहाणेला बेन स्टोक्सच्या हाती झेल द्यायला लावत डावातील आपला दुसरा बळी मिळवला.
रहाणेला बाद करताच अँडरसनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले ९०० बळी पूर्ण केले. ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅकग्रा व पाकिस्तानच्या वसीम अक्रम यांच्यानंतर ९०० आंतरराष्ट्रीय बळी मिळवणारा तो केवळ तिसरा वेगवान गोलंदाज आहे. मॅकग्राच्या नावे ३७६ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ९४९ बळींची नोंद आहे. तर, वसीम अक्रमने ४६० सामने खेळताना ९१६ बळी आपल्या नावे केले होते.
अँडरसन सध्या आपला ३७३ वा आंतरराष्ट्रीय सामना खेळत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फक्त ६ गोलंदाजांनी ९०० पेक्षा जास्त बळी मिळवले आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ९०० पेक्षा जास्त बळी मिळवणारे गोलंदाज
मुथय्या मुरलीधरन- १,३३७
शेन वॉर्न- १,००१
अनिल कुंबळे- ९५६
ग्लेन मॅकग्रा- ९४९
वसिम अक्रम- ९१६
जेम्स अँडरसन- ९००*
महत्त्वाच्या बातम्या –
काय अरे पंत! स्टंप्सवरील बेल्स उडून अडकले ग्लोजमध्ये अन् त्याला पत्त्याही नाही, मग काय झालं पाहा
ये तो शुरू होते ही खत्म हो गया! विराट शून्यावर बाद झाल्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस






