कोरोनाच्या दुसर्या लाटेने भारतात सध्या कहर केला आहे. दिवसागणिक रुग्णसंख्या वाढतच असून मृतांच्या संख्येतही वाढ होते आहे. अशा परिस्थितीत आता विविध खेळाडूंनी भारतासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. आयपीएल मध्ये खेळणाऱ्या परदेशी तसेच भारतीय खेळाडूंनी देखील आपापल्या परीने कोरोना लढ्यासाठी आर्थिक मदत केली आहे. यातच आता भर पडली आहे ती चेन्नई सुपर किंग्जचा वेगवान गोलंदाज जेसन बेहरेनडॉफ याची.
कोरोना लढ्यासाठी केली आर्थिक मदत
यापूर्वी भारताला कोरोना विरोधातील लढाई साठी मदत म्हणून ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्स आणि ब्रेट ली यांनी मदत केली होती. आता यात जेसन बेहरेनडॉफने देखील आपला हातभार लावण्याचे ठरवले आहे. त्याने ट्विट करत आपण मदत करणार असल्याचे जाहीर केले. युनिसेफच्या कोरोना विरोधी लढ्याच्या मोहिमेत त्याने ही आर्थिक मदत देणार असल्याचे सांगितले आहे. ही घोषणा करतांनाच त्याने भारतीयांसाठी एक संदेश देखील लिहिला.
ट्विट करत तो म्हणाला, “इतर अनेक क्रिकेटपटूंसारखाच भारत माझ्यासाठी देखील एक अतिशय खास जागा आहे. अतिशय सुंदर देश आणि येथील लोक देखील अतिशय प्रेमळ आहेत. भारतात क्रिकेट खेळणे, हा कायमच एक सुखद अनुभव ठरला आहे. मात्र सध्या भारतात जी परिस्थिती आहे ते पाहून मन सुन्न झाले आहे. हे अतिशय भयावह आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी माझ्या बाजूने काहीतरी करावं, असं मला वाटलं. आणि म्हणूनच मी युनिसेफच्या मदत निधी द्वारे मदत करतो आहे. तसेच ज्यांना मदत शक्य आहे, त्यांनी देखील मदत करावी, असे आवाहन करतो आहे.”
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल रद्द झाल्याने दिल्ली कॅपिटल्सच्या ‘या’ खेळाडूंनी धरली मायदेशाची वाट
आयपीएलला देखील कोरोनाचा तडाखा; आजी-माजी क्रिकेटपटूंकडून आल्या ‘अशा’ प्रतिक्रिया






