भारतीय संघाने इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात उत्कृष्ट प्रदर्शन करत सामना आपल्या खिशात टाकला. ज्यामुळे भारतीय संघ ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत ०-१ ने आघाडीवर आहे. यामुळे भारतीय संघाचे चाहत्यांकडून चांगलेच कौतुक केले जात आहे. तसेच विरोधी संघातील माजी खेळाडूंकडून देखील भारतीय संघाचे कौतुक केले जात आहे.
दरम्यान, चौथ्या दिवसापर्यंत इंग्लंडचा संघ मजबूत स्थितीत होता. मात्र लॉर्ड्सच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात दोन्ही संघांमधील झालेला वाद देखील चांगलाच चर्चेचा विषय ठरला होता. याचाच फायदा भारतीय संघाने उचलत ५ व्या दिवशी इंग्लंडवर एकहाती वर्चस्व गाजवले. त्यामुळे भारतीय संघाला विजय मिळाला.
सामन्यादरम्यान इंग्लिश खेळाडू भारताचा गोलंदाज जसप्रीत बुमराहला चांगलेच भिडत होते. याला कारण पहिल्या डावात अँडरसन जेव्हा फलंदाजी करत होता, तेव्हा बुमराहने त्याला लागोपाठ बाउन्सर गोलंदाजी केली होती. त्यातला एक चेंडू अँडरसनच्या हेल्मेटला देखील लागला होता. यामुळे अँडरसन बुमराहवर चांगलाच भडकला होता. अँडरसन जेव्हा आऊट झाला तेव्हा, त्याने बुमराहबद्दल काहीतरी टिप्पणी केली. याबाबतचा खुलासा आता अश्विनच्या एका व्हिडिओतून झाला आहे.
अश्विनच्या व्हिडीओ नुसार अँडरसनने बुमराहवर बेईमानीचा आरोप केला होता. झाले असे की, गुरुवारी (१९ ऑगस्ट) अश्विनने त्याच्या यूट्यूब चॅनलवर क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर सोबत लॉर्ड्सच्या कसोटी सामन्याबद्दल चर्चा केली होती. सदर चर्चा तमिळमध्ये होती.
ज्यामध्ये समजते की, अँडरसन बुमराहच्या गोलंदाजीवर खूप नाराज होता. कारण, बुमराहने इंग्लंडच्या इतर खेळाडूंना मध्यम गतीने गोलंदाजी केली होती. मात्र अँडरसनला वेगाने गोलंदाजी केल्यामुळे नाराज होता. याबाबत अँडरसन बुमराहला म्हणाला, “तू इतर फलंदाजांना ८०-८५ मिल वेगाने गोलंदाजी केली. मात्र मला ९० मिलच्या वेगाने गोलंदाजी केली. ही बेईमानी होती.”
यानंतर ड्रेसिंग रूमकडे जाताना बुमराहने अँडरसनला मुद्दामहून बाउन्सर गोलंदाजी केले नसल्याचे सांगितले. याआधी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी विराट कोहली फलंदाजी करत असताना अँडरसनने त्याच्याशी हुज्जत घातली होती. तेव्हा अँडरसनने बुमराहला शिवीगाळ केल्याचे कोहलीने ऐकल्याचे म्हटले गेले.
त्यानंतर, दुसऱ्या डावात बुमराह जेव्हा फलंदाजीला आला तेव्हा, इंग्लिश गोलंदाजांनी देखील बुमराहवर बाउन्सरचा प्रहार करायला सुरुवात केली. मात्र बुमराहने चांगली खेळी करत मोहम्मद शमीसोबत ९ व्या विकेटसाठी ८९ धावांची भागीदारी केली. ज्यामुळे भारतीय संघाने ५ व्या दिवशी सामन्यात पुनरागमन केले. ज्यानंतर इंग्लंडला २७२ धावांचे लक्ष्य मिळाले. याच्या बदल्यात भारतीय संघाने इंग्लंडला केवळ १२० धावातच गारद केले.
दरम्यान, इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील तिसरा कसोटी सामना २५ ऑगस्ट पासून हेडींग्लेच्या मैदानावर होणार आहे. लॉर्ड्सच्या विजयामुळे भारतीय संघ चांगल्या लयात असेल, तर इंग्लंडचा संघ मालिकेत पुनरागमन करण्याच्या तयारीत असेल.
महत्वाच्या बातम्या –
–Video: लॉर्ड्सवरील ऐतिहासिक विजयानंतर लंडनमध्ये भारतीय चाहत्यांनी धरला ‘सात समंदर पार’ गाण्यावर ठेका
–पंजाबने तब्बल २२ कोटी खर्च केलेले खेळाडू उर्वरित आयपीएल २०२१ मधून बाहेर, ‘हा’ नवखा खेळाडू संघात सामील
–“दोन्ही देशांतील संबंध सुधारल्यास भारतात जाणारा मी पहिला पाकिस्तानी असेल”






