चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी तयारी सुरू असतानाच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यांतून बाहेर पडणार आहे. विशेषतः भारत-पाकिस्तान या महत्त्वाच्या सामन्यात बुमराहची खेळण्याची शक्यता कमी आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेदरम्यान बुमराहला पाठीच्या दुखापतीचा सामना करावा लागला होता. अखेरच्या कसोटी दरम्यान दुखापत झाल्यानंतर त्याला तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं. प्राथमिक तपासणीत त्याच्या पाठीला फॅक्चर नसून सूज असल्याचं सांगितलं जात आहे. बुमराहला पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी वेळ लागणार असून तो मार्चच्या पहिल्या आठवड्यातच मैदानावर परतू शकतो, असं बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितलं.
बुमराह आता राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) पुनर्वसनासाठी दाखल होणार आहे. तिथे तीन आठवड्यांपर्यंत त्याच्या फिटनेसचं मूल्यांकन केलं जाणार आहे. जर तो पूर्णपणे तंदुरुस्त झाला, तरच त्याला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी मुख्य संघात स्थान मिळेल. दरम्यान, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची अधिकृत घोषणा अद्याप झाली नसली, तरी बुमराहच्या अनुपस्थितीत भारतीय गोलंदाजीवर दबाव वाढण्याची शक्यता आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याचं महत्त्व लक्षात घेता, बुमराहच्या जागी कोणाला संधी मिळणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
जसप्रीत बुमराह गेल्या काही काळापासून दुखापतीनं त्रस्त आहे. तो 2022 च्या टी20 विश्वचषकाचा भाग नव्हता. याशिवाय तो 2023 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्सशिपचा अंतिम सामनाही तो खेळू शकला नव्हता. बॉर्डर-गावस्कर मालिकेदरम्यान जसप्रीत बुमराह भारतीय संघासाठी किती महत्त्वाचा आहे, हे सर्वांनी पाहिलं. तो मालिकेत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज होता. या कामगिरीसाठी त्याला मालिकावीराच्या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. त्यामुळे टीम मॅनेजमेंट त्याच्या फिटनेसला अधिक प्राधान्य देत आहे.
हेही वाचा –
2024 च्या टी20 वर्ल्ड कपनंतर भारतासाठी सर्वाधिक धावा कोणी केल्या? यादी आश्चर्यकरणारी!
मुंबई इंडियन्समध्ये निवड होताच आयसीसी स्पर्धेचं कर्णधारपद मिळालं, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी किवी संघ जाहीर
IND vs ENG: गिल-पंतसह या 5 खेळाडूंना टीम इंडियातून बाहेरचा रस्ता, कारण गुलदस्त्यात!