इंडियन प्रीमियर लीग २०२१ मध्ये मंगळवारी (२० एप्रिल) मुंबई इंडियन्स व दिल्ली कॅपिटल्स यांच्यादरम्यान सामना खेळला गेला. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने विजय मिळवला. मुंबईचा हा स्पर्धेतील दुसरा पराभव आहे. मात्र, या सामन्यात मुंबईसाठी हंगामातील पहिलाच सामना खेळत असलेल्या जयंत यादवचा खेळ मुंबईसाठी सकारात्मक बाब राहिली.
जयंत यादवची अष्टपैलू कामगिरी
मुंबई इंडियन्सचा अनुभवी फिरकीपटू जयंत यादवला या सामन्यात वेगवान गोलंदाज ऍडम मिल्नेच्या जागी संधी मिळाली. त्याचा हंगामातील हा पहिलाच सामना होता. जयंतने यापूर्वी आपला अखेरचा आयपीएल सामना मागील वर्षीच्या अंतिम सामन्यात खेळला होता. जयंतला संधी देण्यासाठी मुंबईने या सामन्यात केवळ ३ विदेशी खेळाडू खेळवले.
कर्णधार आणि संघ व्यवस्थापनाने टाकलेला विश्वास जयंतने पहिल्याच सामन्यात सार्थ ठरविला. संघाचे प्रमुख फलंदाज बाद झाले असताना जयंतने ईशान किशनसह सातव्या गड्यासाठी ३९ धावा जोडल्या. जयंतने कगिसो रबाडाच्या गोलंदाजीवर बाद होण्यापूर्वी २२ चेंडूत एका चौकारासह २३ धावा काढल्या.
गोलंदाजी करताना जयंत यादवने संघासाठी डावातील दुसरे षटक टाकले. या षटकातील तिसऱ्याच चेंडूवर त्याने जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या दिल्लीचा सलामीवीर पृथ्वी शॉला स्वतःच्या गोलंदाजीवर झेल घेत बाद केले. जयंतने आपल्या चार षटकात केवळ २५ धावा देत एक बळी आपल्या नावे केला.
https://twitter.com/brahmareddy33/status/1384541317338828805?s=20
जयंत यादवची आयपीएल कारकिर्द
देशांतर्गत क्रिकेटमध्ये हरियाणाचे प्रतिनिधित्व करणारा जयंत यादव आयपीएलमध्ये आत्तापर्यंत दिल्ली कॅपिटल्स व मुंबई इंडियन्ससाठी खेळला आहे. आयपीएलमध्ये त्याने १५ सामने खेळताना ७ बळी देखील मिळवले आहेत. जयंतने आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे ४ कसोटी व १ वनडे सामन्यात प्रतिनिधित्व केले आहे.
महत्वाच्या बातम्या:
DC vs MI : मुंबई पलटणवर दिल्लीचे शिलेदार भारी, ६ विकेट्स राखून केला पराभव
लवकरच मॅराडोनाची जादू झळकणार मोठ्या पडद्यावर, ॲमेझॉनने लॉन्च केला वेबसिरीजचा टिझर