गुरुवारी (१० मार्च) महिला विश्वचषक २०२२ मध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात सामना पार पाडला. या सामन्यात भारतीय संघाला न्यूझीलंडने ६२ धावांनी पराभूत केले. मात्र, भारतीय महिला संघाची अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीने न्यूझीलंडविरुद्ध एक विकेट घेत चक्क इतिहासच रचला. झुलनने आयसीसी महिला विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत संयुक्तरीत्या अव्वल क्रमांक पटकावला आहे. ३९ वर्षीय झुलनचा ही महिला विश्वचषकातील ३९ वी विकेट होती. तिने ऑस्ट्रेलियाच्या लिन फुल्स्टनची बरोबरी केली आहे.
ऑस्ट्रेलियाच्या फुल्स्टनने २० सामन्यांमध्ये ३९ विकेट्स चटकावले होते, तर दुसरीकडे झुलन गोस्वामीने (Jhulan Goswami) ही कमाल तिच्या ३० व्या सामन्यात केली. आता झुलनला हा विश्वविक्रम आपल्या नावावर करण्यासाठी अवघ्या १ विकेटची आवश्यकता आहे. ही कमाल ती सध्या खेळल्या जात असलेल्या महिला विश्वचषकात पूर्ण करणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, झुलन २००५ सालापासून महिला विश्वचषकात भाग घेत आहे. तसेच, हा तिचा पाचवा विश्वचषक आहे.
महिला विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर इंग्लंडची कॅरोल होजस आहे. तिने २४ सामन्यात ३७ विकेट्स घेतल्या आहेत. इंग्लंडची क्लेर टेलरने २६ सामन्यात ३६ विकेट्स घेतल्या असून ती या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. यानंतर चौथ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाची कॅथरीन फिट्जपॅट्रिक असून तिने २५ सामन्यात ३३ विकेट्स घेतल्या आहेत.
झुलन गोस्वामीबद्दल बोलायचं झालं, तर तिने आतापर्यंत १९७ वनडे सामन्यात २४८ विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये तिने २ वेळा एका डावात ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत.
या विक्रमाव्यतिरिक्त झुलनच्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद झाली आहे. तो विक्रम म्हणजेच, महिला वनडे विश्वचषकात सर्वाधिक डावांमध्ये किमान एक विकेट घेणाऱ्या महिला गोलंदाजांमध्ये अव्वल क्रमाकांवर विराजमान झाली आहे.
तिने विश्वचषकात आतापर्यंत खेळलेल्या २१ डावांमध्ये किमान एक विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे. तिच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंडची कॅथरिन कँपबेल आहे. तिने विश्वचषकातील २० डावांमध्ये किमान एक विकेट घेतली आहे. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर संयुक्तरीत्या इंग्लंडची कॅरोल होजस आणि ऑस्ट्रेलियाची लिसा स्थळेकर आहेत. त्यांनी १९ डावांमध्ये ही कामगिरी केली आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड संघाबद्दल बोलायचं झालं, तर भारतीय कर्णधार मिताली राजने (Mithali Raj) न्यूझीलंडविरुद्ध नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. ऍमी सदरवेट (७५) आणि एमिलिया केर (५०) यांच्या शानदार खेळीमुळे न्यूझीलंड संघाने निर्धारित ५० षटकात ९ विकेट्स गमावत २६० धावा ठोकल्या होत्या. त्यानंतर भारताकडून गोलंदाजी करताना पूजा वस्त्राकारने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तसेच राजेश्वरी गायकवाडने २ विकेट्स घेतल्या. याव्यतिरिक्त झुलन गोस्वामी आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येक १ विकेट खिशात घातली.
न्यूझीलंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून हरमनप्रीत कौरने सर्वाधिक ७१ धावा कुटल्या. त्यात २ षटकार आणि ६ चौकारांचा समावेश होता. याव्यतिरिक्त कर्णधार मिताली राज (३१) आणि यास्तिका भाटिया (२८) यांनीही योगदान दिले. मात्र, इतर फलंदाजांना २० धावांचा आकडा पार करता आला नाही.
भारतीय महिला संघाचा पुढील सामना शनिवारी (१२ मार्च) वेस्ट इंडिजविरुद्ध हॅमिल्टन येथे होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
महिला विश्वचषक: हरमनप्रीतची एकाकी झुंज व्यर्थ, भारताचा न्यूझीलंडविरुद्ध मानहानिकारक पराभव
सलामीचा फलंदाज असणारा श्रीसंत ‘असा’ झाला वेगवान गोलंदाज
Video: एकदम भन्नाट! पुजा वस्त्राकरच्या जबरदस्त डायरेक्ट थ्रोवर न्यूझीलंडची सुझी बेट्स रनआऊट