इंग्लंड क्रिकेट संघाचा कर्णधार जो रुट सध्या कमालीच्या फॉर्ममध्ये आहे. मागील श्रीलंकाविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याने द्विशतकी आणि दीडशतकी खेळी केली होती. शुक्रवारपासून (०५ फेब्रुवारी) भारत विरुद्ध इंग्लंड संघात चेन्नईच्या मैदानावर सुरू झालेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाखेर त्याने शतक पूर्ण केले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशीही लय कायम ठेवत धडाकेबाज फलंदाजी करत त्याने द्विशतक झळकावले आहे.
विशेष म्हणजे, १४३ व्या षटकात आर अश्विनविरुद्ध खणखणीत षटकार मारत रुटने २०० धावांचा आकडा पूर्ण केला आहे. यासह तो कसोटी क्रिकेटमध्ये षटकारासह द्विशतक पूर्ण करणारा इंग्लंडचा पहिलाच फलंदाज ठरला आहे.
झाले असे की, दुसऱ्या दिवशी रुटने आपल्या १२८ धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली. संघसहकारी बेन स्टोक्ससोबत मिळून डावास चालना देताना त्यांनी शंभरहून अधिक धावांची भागिदारी साकारली. अखेर डावातील १२७ व्या षटकात भारताचा फिरकीपटू शाहबाज नदीम याने स्टोक्सला बाद करत त्यांची भागिदारी तोडली. यामुळे ११८ चेंडूत ८२ धावा करत स्टोक्स पव्हेलियनला परतला.
परंतु रुटने पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या ऑली पोपसोबत मिळून १४२ व्या षटकापर्यंत आपल्या १९४ धावा केल्या. त्यानंतर पुढील षटक टाकण्यासाठी भारताचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विन आला. त्याच्या षटकातील पहिल्या चेंडूवर रुटने एक धाव घेतली. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर ऑली पोपने एक धाव काढली आणि रुट पुन्हा स्ट्राईकवर आला. रुटला द्विशतक करण्यासाठी आता अवघ्या ५ धावांची गरज होती. अशात अश्विनच्या तिसऱ्या चेंडूवर त्याने गगनचुंबी षटकार ठोकला आणि आपले द्विशतक साजरे केले.
कौतुकास्पद बाब अशी की, चेन्नईत चालू असलेला पहिला कसोटी सामना हा रुटचा १०० वा कसोटी सामना आहे. या खास सामन्यात द्विशतक करत रुट १०० व्या कसोटी सामन्यात द्विशतक झळकावणारा पहिलाच फलंदाज ठरला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs ENG Test Live : इंग्लंडचा कर्णधार जो रुटचा द्विशतकी धमाका, इंग्लडच्या ४ बाद ४४५ धावा
INDvsENG: सलग तीन कसोटीत जो रुटची दीडशतकी खेळी, दिग्गजांच्या मांदियाळीत केला प्रवेश
क्रिकेट.. क्रिकेट.. आणि फक्त क्रिकेटच, पाहा पुढील दोन वर्षांचे वेळापत्रक