चेन्नई। भारत विरुद्ध इंग्लंड संघात शुक्रवारपासून (५ फेब्रुवारी) ४ सामन्यांची कसोटी मालिका सुरु झाली. या मालिकेतील चेन्नई येथे होत असलेला पहिला सामना इंग्लंडचा कर्णधार जो रुटसाठी खुप खास ठरला आहे. हा त्याच्या कसोटी कारकिर्दीतील १०० वा सामना आहे. याबरोबरच त्याने एक खास विक्रमही केला आहे.
जो रुट हा सर्वात कमी वयात १०० वा कसोटी सामना खेळणारा तिसऱ्या क्रमांकाचा क्रिकेटपटू ठरला आहे. तो जेव्हा भारताविरुद्ध त्याच्या कसोटी कारकिर्दीतील १०० वा कसोटी सामना खेळण्यासाठी उतरला तेव्हा त्याचे वय ३० वर्षे ३७ दिवस इतके होते.
विशेष म्हणजे रुटने त्याच्या १०० व्या कसोटी सामन्यात शतकी खेळी देखील केली आहे. त्यामुळे तो कारकिर्दीतील १०० व्या कसोटीत शतक करणारा ९ वा फलंदाजही आहे.
या लेखात आपण सर्वात कमी वयात १०० वा कसोटी सामना खेळणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीतील पहिल्या दोन क्रिकेटपटूंबद्दल जाणून घेऊ.
२. सचिन तेंडुलकर – (२९ वर्षे आणि १३४ दिवस)
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने त्याच्या कारकिर्दीत अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. तो २०० कसोटी सामने खेळणारा पहिला आणि एकमेव क्रिकेटपटूही आहे. सचिनने त्याच्या कारकिर्दीत त्याचा १०० वा कसोटी सामना २००२ मध्ये इंग्लंडविरुद्ध द ओव्हल मैदानात खेळला होता. त्यावेळी सचिन केवळ २९ वर्षे १३४ दिवसांचा होता. त्यामुळे त्यावेळी तो १०० वा कसोटी सामना खेळणारा सर्वात युवा खेळाडू ठरला होता. पण त्याचा हा विक्रम ११ वर्षांनी मोडला. सचिनने त्याच्या कसोटी कारकिर्दीत २०० सामन्यांमध्ये खेळताना १५९२१ धावा केल्या आहेत.
१. ऍलिस्टर कूक – (२८ दिवस आणि ३५३ दिवस)
इंग्लंडचा सर्वात यशस्वी फलंदाज म्हणून ओळखला जाणाऱ्या ऍलिस्टर कूकच्या नावावर सर्वात कमी वयात १०० वा कसोटी सामना खेळण्याचा विक्रम आहे. कूकने २०१३ साली पर्थ येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याच्या कसोटी कारकिर्दीतील १०० वा कसोटी सामना खेळला होता. त्यावेळी त्याने वय २८ वर्षे ३५३ दिवस इतके होते. त्यामुळे कूककडे सचिनचा सर्वाधिक कसोटी धावांचा विक्रम मोडू शकणारा फलंदाज म्हणूनही पाहिले जात होते. मात्र, कूकने वयाच्या ३३ व्या वर्षीच कसोटीतून निवृत्ती घेतली. त्याने त्याच्या कारकिर्दीत १६१ सामन्यात १२४७२ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
धक्कादायक! लिव्हरपूलला जर्मनीमध्ये येण्यास बंदी, ‘हे’ आहे कारण
ब्रेकिंग! प्रसिद्ध फुटबॉलपटू आंद्रे ओन्नावर एका वर्षाची बंद, ‘हे’ आहे कारण