मेलबर्न। रविवारपासून (२६ डिसेंबर) ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (Australia vs England) संघात ऍशेस मालिकेतील (Ashes Series) तिसरा कसोटा सामना सुरु झाला. बॉक्सिंग डे कसोटी (Boxing Day Test) असलेल्या या सामन्याच्या पहिल्याच दिवशी इंग्लंड संघावर सर्वबाद होण्याची वेळ आली. दरम्यान, इंग्लंड संघाचा कर्णधार जो रूट त्याच्या विकेटनंतर चिडलेलाही दिसला. त्याच्या चिडण्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
झाले असे की, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून इंग्लंडला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. हा निर्णय योग्य ठरवत ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराने इंग्लंडच्या पहिल्या तीन विकेट्स स्वस्तात घेतल्या. मात्र, एकीकडे विकेट जात असताना दुसरीकडे चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेला जो रूट (Joe Root) टिच्चून खेळत होता. त्याने त्याचे अर्धशतकही पूर्ण केले.
मात्र दिवसाच्या दुसऱ्या सत्रात त्याला मिशेल स्टार्कने डावाच्या ३३ व्या षटकात चकवले. स्टार्कने टाकलेल्या चेंडूने रुटच्या बॅटची कड घेतली आणि तो चेंडू यष्टीरक्षक ऍलेक्स कॅरेच्या हातात गेला. त्यामुळे रूटने ५० धावांवर विकेट गमावली. कॅरेने झेल पकडल्याचे पाहाताच रूट प्रचंड नाराज झालेला दिसला. त्याने चिडून बॅटवर मुक्काही मारला आणि तो संतापून पॅव्हेलियनमध्ये परतला. तो विकेट गमावल्यानंतर चिडून परत जातानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Joe Root yells in frustration)
Starc gets the big one – England's captain is gone!
Root out for exactly 50 #Ashes pic.twitter.com/cqkjIqCy3W
— cricket.com.au (@cricketcomau) December 26, 2021
😡#Ashes pic.twitter.com/OLNcN67bKC
— cricket.com.au (@cricketcomau) December 26, 2021
रूटव्यतिरिक्त अन्य फलंदाज फ्लॉप
इंग्लंडच्या पहिल्या डावात रूट व्यतिरिक्त अन्य कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. रूटनंतर सर्वाधिक धावा जॉनी बेअरस्टोने केल्या. त्याने ३५ धावांची खेळी केली. तसेच बेन स्टोक्सने २५ धावांची खेळी केली, तर ऑली रॉबिन्सनने २२ धावांचे योगदान दिले. अन्य कोणताही खेळाडू २० धावांच्या पार जाऊ शकला नाही. त्यामुळे इंग्लंडचा डाव ६५.१ षटकांत १८५ धावांवर संपुष्टात आला.
ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्स आणि नॅथन लायनने प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. तसेच मिशेल स्टार्कने २ विकेट्स घेतल्या, तर स्कॉट बोलंड आणि कॅमेरॉन ग्रीनने प्रत्येकी १ विकेट घेतली.
अधिक वाचा – वनडेत कोहली, टी२०त आझम अन् कसोटीत रूट; धावांच्या ‘मोठ्या’ विक्रमांत हे कर्णधारच राहिलेत नंबर १
रूटचा विश्वविक्रम
इंग्लंड संघाची कामगिरी या ऍशेस मालिकेत खराब होत असली तरी रूट वैयक्तिकरित्या चांगल्या लयीत आहे. त्याने एका वर्षात कर्णधार म्हणून सर्वाधिक कसोटी धावा करण्याचा विक्रम केला आहे. त्याने २०२१ वर्षात १५ कसोटी सामन्यांमध्ये इंग्लंडचे नेतृत्त्व करताना ६२.२२ च्या सरासरीने १६८० धावा केल्या आहेत. त्याने हा विक्रम करताना दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथला मागे टाकले आहे. स्मिथने कर्णधार म्हणून २००८ मध्ये १६५७ कसोटी धावा केल्या होत्या.
व्हिडिओ पाहा – बॉक्सिंग डेचा अर्थ, त्याचा इतिहास आणि बरचं काही… |
इतकेच नाही, तर रूटने परदेशात खेळताना २०२१ वर्षांत कसोटीत १००० धावांचा टप्पाही पार केला आहे. एका वर्षात परदेशात १००० धावांचा टप्पा पार करण्याचा कारनामा करणारा तो चौथा कर्णधार आहे. यापूर्वी ग्रॅमी स्मिथ, विराट कोहली आणि बॉब सिम्सन यांनी हा पराक्रम केला आहे. स्मिथने २००८ साली १२१२ धावा केल्या होत्या. तर विराटने २०१८ साली ११३८ धावा केल्या होत्या. सिम्सन यांनी १९६४ साली १०१८ धावा केल्या होत्या. रूटच्या नावावर परदेशात २०२१ वर्षात १०१९ धावा नोंदवल्या गेल्या आहेत.
विशेष म्हणजे रूटने परदेशात २०२१ वर्षांत १००० धावांचा टप्पा तर पार केलाच आहे, पण त्याने १२ विकेट्सही घेतल्या आहेत. त्यामुळे तो परदेशात एका वर्षात १००० धावा आणि १० पेक्षा अधिक विकेट्स घेणारा पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“रोहित नसतानाही टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौरा फत्ते करेल”
हार्दिक पंड्याची चाहत्यासोबतची वर्तवणूक पाहून नेटकरी ‘गुश्श्यात’, म्हणाले, ‘भाऊ जुणे दिवस विसरला’
बॅट हातात घेण्याआधीच विराटने केला ‘महापराक्रम’! ठरला ‘या’ बाबतीत भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार