गोवा : सांघिक कामगिरी उंचावत केरला ब्लास्टर्स एफसीने तळातील एससी ईस्ट बंगालवर १-० असा विजय मिळवताना हिरो इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) आठव्या हंगामातील अव्वल चार संघांत स्थान मिळवले.
‘व्हॅलेंटाइन डे’ स्पेशल सामन्यात सोमवारी केरला ब्लास्टर्स एफसीला तुलनेत कमकुवत प्रतिस्पर्ध्याविरुद्ध जास्त गोल करण्यात अपयश आले तरी ४९व्या मिनिटाला इनेस सिपोव्हिकने केलेला एकमेव गोल निर्णायक ठरला. लालथाथांगा खावरिंगच्या अचूक पासवर सिपोव्हिकने प्रतिस्पर्धी गोलकीपरला चकवत चेंडू थेट गोलजाळयात टाकला. सिपोव्हिक आणि लालाथाथांगासह या गोलचे क्रेडिट जॉर्ज डियाझला जाते. त्याने ईस्ट बंगालच्या बचावफळी वर्चस्व मिळवत कॉर्नर क्षेत्रातून लालथाथांगाकडे चेंडू सोपवला. त्यानंतर डाव्या बाजूने आलेल्या चेंडूचे गोलामध्ये रूपांतर करताना सिपोव्हिकने केरला ब्लास्टर्सला आघाडीवर नेले.
उत्तरार्धातील उर्वरित ४१ मिनिटांमध्ये ईस्ट बंगालच्या आघाडी फळीने बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रतिस्पर्धी संघाची बचावफळी मजबूत ठरली. दुसरीकडे, केरला ब्लास्टर्सनीही आघाडी वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ईस्ट बंगालच्या बचावपटूंनी त्यांना चांगलेच रोखले. टिळक मैदानावर झालेल्या लढतीत पूर्वार्धात गोलफलक कोराच राहिला. पहिल्या ४५ मिनिटांमध्ये केरला ब्लास्टर्सनी गोल करण्याच्या अनेक संधी निर्माण केल्या. पण त्यांना संधीचे गोलात रूपांतर करण्यात अपयश आले. दुसरीकडे, ईस्ट बंगालने गोल करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. मात्र, त्याचा गोलफलक कोराच राहिला.
मागील लढतीत जमशेदपूर एफसीकडून ३-० असा मोठा पराभव पाहावा लागलेल्या केरला ब्लास्टर्सनी सातवा विजय नोंदवताना अव्वल चार संघांमध्ये धडक मारली. तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतलेल्या त्यांच्या खात्यात १५ सामन्यांनंतर २६ गुण आहेत. केरला ब्लास्टर्स आणि दुसऱ्या स्थानी असलेल्या एटीके मोहन बागान आणि केरला ब्लास्टर्सचे समान गुण आहेत. मात्र, गोलफरकाच्या आधारे मोहन बागानने वरचे स्थान राखले आहे. टॉपला असलेला हैदराबाद एफसी तसेच केरला ब्लास्टर्स आणि मोहन बागान यांच्यात आता केवळ तीन गुणांचा फरक आहे.
मागील लढतीत ओदिशा एफसीला (२-१) झुंजवणाऱ्या आणि त्या आधी चेन्नईयन एफसीला बरोबरीत (२-२) रोखणाऱ्या ईस्ट बंगालला सोमवारी अपेक्षित लढत देता आली नाही. त्यामुळे आव्हान संपुष्टात आलेल्या एसी ईस्ट बंगालची खराब कामगिरीची मालिका कायम राहिली. १७ सामन्यांमधील त्यांचा हा सातवा पराभव आहे. सोमवारच्या विजयासह केरला ब्लास्टर्सने पहिल्या टप्प्यातील बरोबरीचा बदला घेतला.
निकाल : केरला ब्लास्टर्स एफसी १(इनेस सिपोव्हिक-४९व्या मिनिटाला) विजयी वि. एससी ईस्ट बंगाल ०.
महत्त्वाच्या बातम्या-
दुखापतीमुळे संघाबाहेर असलेल्या राहुलने गर्लफ्रेंड अथियासोबत शेअर केला ‘व्हॅलेंटाईन’, फोटो एकदा बघाच
बिग ब्रेकिंग! भारताला तिसरा धक्का, अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर टी२० मालिकेतून बाहेर; ‘हे’ आहे कारण
यूपी योद्धांपुढे दबंग दिल्लीची शरणागती, ४४-२८च्या मोठ्या फरकाने सामना खिशात