इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडवर दमदार विजय मिळवला. या सामन्यातील दुसऱ्या डावात जसप्रीत बुमराहने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर सामन्याचा निर्णय बदलला. ज्यामुळे बुमराहचे सर्वत्र कौतुक केले जात होते. यातच आता इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसनने देखील बुमराहचे कौतुक करत डेल स्टेनची आठवण करून दिल्याचे सांगितले.
बुमराहने चौथ्या कसोटी सामन्यात शेवटच्या दिवशी भेदक गोलंदाजी करत मधल्या फळीतील ओली पोप (०२) आणि जॉनी बेयरस्टोला (००) त्रिफळाचीत केले. बुमराहच्या या भेदक गोलंदाजीमुळे सामन्याचा निर्णय बदलण्यात बुमराहने महत्त्वाची भूमिका बजावली.
बेटवेच्या एका ब्लॉगमध्ये केविन पीटरसनने लिहिले की, “तो दीर्घकाळापर्यंत गोलंदाजी करू शकतो. तेही आक्रमकपणे, अचूक, वेग आणि शिस्तीमध्ये राहून. त्याच्या या गोलंदाजीने त्याने मला डेल स्टेनची आठवण करून दिली. ज्याने मागील आठवड्यात निवृत्ती घेतली होती. माझ्यासाठी स्टेन आतापर्यंतचा सर्वात महान वेगवान गोलंदाज आहे. कारण त्यानेही अनेक वेळा कठीण परिस्थितीत देखील सामन्याचे निर्णय बदलण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.”
“बुमराह डेल स्टेन सारखा गोलंदाज तर बनू नाही शकत, मात्र जगातील कोणत्याही विरोधी संघावर वर्चस्व गाजवण्याची त्याची क्षमता त्याला एक अनोखा गोलंदाज बनवते,” असेही पीटरसन म्हणाला.
पीटरसन सोबतच इंग्लंडचा कर्णधार जो रूटने देखील जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीचे कौतुक केली होते. चौथ्या कसोटी सामन्यात पराभव पत्करावा लागल्यानंतर रूट म्हणाला होता की, बुमराहकडून रिव्हर्स स्विंग केलेले षटक सामन्याचा निर्णायक क्षण ठरला. ज्यामुळे हा सामना भारतीय संघाकडे वळला. ६१ व्या षटकापर्यंत इंग्लंड १४१ धावांवर २ विकेट्स अशा चांगल्या स्थितीत होता. मात्र, बुमराहने ओली पोप आणि जॉनी बेयरस्टो यांना बाद करत इंग्लिश संघाच्या मधल्या फळीला उध्वस्त केले.
याबाबत जो रूट म्हणाला, “बुमराह एक उत्कृष्ट गोलंदाज आहे. आम्ही हे मान्य करतो की, त्याने गोलंदाजीचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. ही एक जागतिक स्तरावरची गोलंदाजी होती, जर आम्ही भविष्यात अशा स्थितीत राहिलो तर चांगल्या प्रकारे सांभाळू शकतो.”
दरम्यान, आतापर्यंत झालेल्या ४ कसोटी सामन्यांनंतर भारतीय संघाने मालिकेत २-१ ने आघाडी मिळवली आहे. त्यामुळे भारतीय संघ सध्या या मालिकेत मजबूत स्थितीत आहे. इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर शुक्रवारपासून (१० सप्टेंबर) होणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
–Video: भारतीय मूळच्या अमेरिकन फलंदाजाने केली कमाल! गिब्सनंतर वनडेत ठोकले सलग ६ षटकार
–ओव्हल कसोटीचा हिरो ठरलेला बुमराह अखेरच्या सामन्यात होऊ शकतो बाहेर, ‘हे’ आहे कारण
–‘स्वप्न पूर्ण होतात!’ टी२० विश्वचषकासाठी निवड झाल्यानंतर सूर्यकुमारची भावूक पोस्ट