सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांचा समावेश जागतिक क्रिकेटमधील सर्वकालीन महान फलंदाजांमध्ये होतो. परंतु, माजी भारतीय यष्टिरक्षक आणि माजी निवडसमिती अध्यक्ष किरण मोरे (Kiran More) यांनी गावसकर यांना नेट्स मधील सर्वात खराब फलंदाज म्हणून संबोधले आहे.
गावसकर यांच्याविषयी सांगताना किरण मोरे म्हणतात, “गावसकर हे नेटमध्ये अशी फलंदाजी करायचे, ते पाहून भीती वाटायची की उद्या सामन्यात हे कसे रन्स काढतील? बाकीच्या खेळाडूंच्या तुलनेत नेटमध्ये ते म्हणावी अशी फलंदाजी करत नसत.”
पुढे बोलताना मोरे म्हणाले, ” दुसऱ्या दिवशी सामन्यात त्यांचा खेळ पाहून असं वाटत की हा तो कालचा खेळाडू नाहीच ! त्यांचा खेळ ९९.९% बदललेला असे. त्यांचे अप्रतिम फटके पाहून तोंडातून आपोआप, क्या बात ! असे उद्गार बाहेर पडत.”
किरण मोरे यांनी गावसकरांची स्तुती करताना म्हणाले,” त्यांची एकाग्रता कमालीची होती. एकदा गावसकर खेळपट्टीवर चिकटले की भल्याभल्या गोलंदाजांना त्यांना बाद करणे कठीण होऊन जात. मग तुम्ही त्यांना काही बोला, उकसवण्याचा प्रयत्न करा, नाहीतर त्यांच्यापुढे नाचा त्यांचे लक्ष फक्त क्रिकेटवर असत.”
आपल्या वैयक्तिक संबंधावर भाष्य करताना किरण मोरे सांगतात, ” ते खूप शिस्तप्रिय होते. माझे आणि त्यांचे चांगले जमायचे. आम्ही दोघे पश्चिम विभागासाठी एकत्र खेळत असत.”
सुनील गावसकर हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिले असे खेळाडू होते ज्यांनी १०,००० धावांचा टप्पा पार केला होता तसेच डॉन ब्रॅडमन (Don Bradman) यांचा २९ शतकांचा विश्वविक्रम देखील गावस्कर यांनी मोडला होता.