भारतीय क्रिकेट संघ सध्या विश्रांतीवर आहे. भारतीय खेळाडू शेवटचे श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळताना दिसले होते. आता रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघ दोन कसोटी सामने आणि तीन टी20 सामन्यांच्या मालिकांसाठी बांगलादेश संघाचे यजमानपद भूषवेल. बांगलादेश संघाचा भारत दौरा 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.
कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाचे अनेक प्रमुख खेळाडू 5 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या दुलीप ट्रॉफी 2024 मध्ये भाग घेतील. पहिल्या फेरीत 4 संघ सहभागी होणार असून, त्यासाठी सर्व संघांची घोषणाही झाली आहे. भारतीय संघातील अनेक खेळाडूंसाठी ही स्पर्धा खूप महत्त्वाची आहे. कारण या स्पर्धेत खेळाडूंनी केलेल्या कामगिरीचा त्यांच्या कारकिर्दीवरही परिणाम होऊ शकतो. या लेखात आम्ही त्या 3 खेळाडूंचा उल्लेख करणार आहोत, ज्यांच्यासाठी दुलीप ट्रॉफी टर्निंग पॉइंट ठरू शकते.
दुलीप ट्रॉफी या तीन खेळाडूंच्या कारकिर्दीला कलाटणी देणारी ठरू शकते
3. इशान किशन
युवा यष्टिरक्षक फलंदाज इशान किशनची टीम डी मध्ये निवड झाली आहे. इशान बऱ्याच दिवसांपासून भारतीय संघातून बाहेर आहे. इशान संघात पुनरागमन करण्यासाठी मेहनत घेत आहे. अलीकडेच, बुची बाबू स्पर्धेतही त्याने आपल्या उत्कृष्ट फलंदाजीने चर्चा मिळवली आले. आता डावखुरा फलंदाज दुलीप ट्रॉफीमध्येही आपली लय कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. जेणेकरून याद्वारे तो पुन्हा निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेऊ शकेल. या स्पर्धेत तो अपयशी ठरला तर राष्ट्रीय संघात पुनरागमन करणे त्याच्यासाठी खूप कठीण जाईल.
2. श्रेयस अय्यर
दुलीप ट्रॉफीमध्ये श्रेयस अय्यर टीम डी चे नेतृत्व करणार आहे. गेल्या काही काळापासून अय्यरची कामगिरीही विशेष राहिली नाही आणि तो धावा काढण्यासाठी धडपडताना दिसत आहे. मात्र, असे असतानाही बीसीसीआयचा त्याच्यावर विश्वास कायम आहे. मात्र संघातील स्थान टिकवण्यासाठी त्याला मोठ्या धावा कराव्या लागतील. दुलीप ट्रॉफी स्पर्धेतील त्याच्या कामगिरीवरही निवड समितीची नजर असेल. त्याची कामगिरी लक्षात घेऊन आगामी बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी संघात निवड करण्याबाबत निर्णय घेतला जाईल.
1. केएल राहुल
रिषभ पंतच्या अनुपस्थितीत केएल राहुलने भारतीय संघासाठी यष्टिरक्षक फलंदाजाची भूमिका बजावली आणि त्याने खूप चांगली कामगिरी केली आहे. मात्र पंतच्या पुनरागमनानंतर एका संघात दोन यष्टिरक्षक फलंदाजांना खेळवणे संघ व्यवस्थापनासाठी कठीण होत आहे. अशा परिस्थितीत आता संघ व्यवस्थापन फक्त त्या खेळाडूलाच संधी देईल ज्याने फलंदाजीत चांगली कामगिरी केली असेल. राहुलला आधीच टी20 संघातून वगळण्यात आले आहे. आता त्याला वनडे आणि कसोटीतूनही बाहेर पडायचे नाही. यामुळे त्याला दुलीप ट्रॉफीमध्येही आपली लय शोधावी लागणार आहे.
हेही वाचा –
रोहित शर्मा दुसऱ्यांदा बनणार बाबा? रितिका सजदेहच्या ‘त्या’ व्हिडिओमुळे चर्चांना उधाण
बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी डेंग्यूतून सावरला वेगवान गोलंदाज, दुलीप ट्रॉफीत खेळणार
ऑस्ट्रेलियाकडून खेळणार भारतीय वंशाच्या 3 क्रिकेटपटू, ‘या’ क्रिकेट मालिकेत घडणार नवीन पराक्रम