वेस्ट इंडीज आणि भारत यांच्यातील तिसरा टी20 सामना मंगळवारी (8 ऑगस्ट) गयानामध्ये खेळला जात आहे. या सामन्याची नाणेफेक वेस्ट इंडीज संघाने जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चांगल्या सुरुवातीनंतर कर्णधार रॉवमन पॉवेल यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे यजमान संघाने निर्धारित 20 षटकात 159 धावा केल्या. भारताकडून गोलंदाजी करताना कुलदीप यादव याने तीन बळी मिळवताना भारताकडून एक मोठी कामगिरी केली.
वनडे मालिकेतील अप्रतिम कामगिरीनंतर टी20 मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याने चांगली गोलंदाजी केलेली. मात्र, दुसऱ्या सामन्याआधी त्याला किरकोळ दुखापत झाल्यामुळे खेळता आले नव्हते. परंतु, तिसऱ्या सामन्यात पुनरागमन करताना त्याने शानदार गोलंदाजी केली. त्याने आपल्या चार षटकात 28 धावा देताना ब्रेंडन किंग, जॉन्सन चार्ल्स व निकोलस पूरन हे तीन महत्त्वपूर्ण बळी मिळवले.
याबरोबरच त्याने आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये बळींचे अर्धशतक पूर्ण केले. भारताकडून सर्वात जलद 50 टी20 गोलंदाज तो यावेळी बनला. त्याने केवळ 29 व्या सामन्यात हा कारनामा करून दाखवला. यापूर्वी त्याचाच संघ सहकारी असलेल्या युजवेंद्र चहल याने 34 सामन्यात ही कामगिरी केलेली. तर भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने 41 सामन्यात 50 टी20 बळी मिळवले होते.
कुलदीप याच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीचा आढावा घेतल्यास त्याने भारतासाठी 29 टी20 सामने खेळताना 14.28 च्या सरासरीने व 6.74 अशा इकॉनॉमी रेटने 50 बळी मिळवले आहेत. 24 धावा देऊन पाच बळी मिळवणे ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. भारतासाठी टी20 क्रिकेटमध्ये यापूर्वी चहल, भुवनेश्वर, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह व हार्दिक पंड्या यांनी 50 बळी मिळवले आहेत.
(Kuldeep Yadav Complete 50 T20I Wickets Fastest Indian Against West Indies)
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तान संघात खळबळ! दिग्गज खेळाडूने संघाशी तोडला संबंध, अमेरिकडून मिळाली ऑफर
‘आम्ही दोन दिवसात…’, विश्वचषक तयारीविषयी भारतीय कर्णधाराची मोठी प्रतिक्रिया