---Advertisement---

रोहित-विराटकडून ही खास गोष्ट शिकला श्रेयस अय्यर

On: सोमवार, जानेवारी 27, 2020 6:18 PM
---Advertisement---

ऑकलंड। रविवारी(26 जानेवारी) भारताने न्यूझीलंड विरुद्ध दुसऱ्या टी20 सामन्यात 7 विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यानंतर भारताचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरने म्हटले आहे की त्याला विराट कोहली आणि रोहित शर्माकडून खुप काही शिकायला मिळाले आहे.

या सामन्यात अय्यरने न्यूझीलंडने दिलेल्या 133 धावांचा पाठलाग करताना 33 चेंडूत 44 धावांची खेळी केली. तसेच त्याने केएल राहुलबरोबर(57*) तिसऱ्या विकेटसाठी 86 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारीही रचली.

या सामन्यानंतर बोलताना अय्यर म्हणाला, ‘मला वाटते धावांचा पाठलाग करताना आपल्याला माहित असते की धावा किती वेगवान करायच्या आहेत. विराट कोहली यासाठी अचूक उदाहरण आहे. जेव्हा जेव्हा तो फलंदाजीला जातो तेव्हा त्याला आपली खेळी कशी उभी करायची हे त्याला माहित असते. मी वैयक्तिकरित्या त्याच्याकडून बरेच काही शिकलो आहे. तो ज्याप्रकारे सामना संपवतो ते सर्वोत्तम आहे.’

तसेच भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माकडूनही शिकायला मिळते हे सांगताना अय्यर म्हणाला, ‘त्याच्याकडून बरेच काही शिकले जाऊ शकते आणि जेव्हा जेव्हा त्याला संधी मिळते तेव्हा तो त्याचा उत्तम वापर करतो. त्यांनी खरोखरच तरुणांसाठी एक चांगले उदाहरण ठेवले आहे. त्यांच्याकडून बरेच काही शिकण्यासारखे आहे.’

तसेच अय्यर त्याच्या फलंदाजीबद्दल बोलताना म्हणाला, ‘मधल्या फळीत, विशेषत: टी20 मध्ये आपण सर्व प्रकारच्या शॉट्स खेळण्यास सक्षम असणे हे महत्वाचे आहे. एकेरी धावांबरोबर षटकार मारता आले पाहिजे. तुम्हाला जाणीव असायला हवी की तूम्ही तूमच्यासाठी संधी तयार करायची आहे. तसेच खेळपट्टीवर स्थिर होण्यासाठी स्वत: ला वेळ द्यावा लागेल.  हेच मी सहसा करतो.’

अय्यरने याआधीही शुक्रवारी(24 जानेवारी) झालेल्या न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यातही 58 धावांची अर्धशतकी खेळी करत भारताच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला होता.

भारताने न्यूझीलंड विरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिले 2 सामने जिंकले आहेत. त्यामुळे मालिकेत भारताने 2-0 अशी आघाडी घेतली आहे. आता तिसरा सामना हॅमिल्टनला 29 जानेवारीला होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---