नवी दिल्ली। केकेएफआय 2021 सुपर लीग खो खो अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्रच्या खेळाडूंनी आपला चांगला फॉर्म कायम ठेवला आहे. साखळी फेरीतील शेवटच्या दिवशी ब गटातील लढतीत पहाडी बिल्लाजने शार्क्स संघावर 20 गुणांनी विजय मिळवला. संघाच्या विजयात महाराष्ट्रच्या तब्बल पाच खेळाडूंनी चमक दाखवली.
इंदिरा गांधी स्टेडियम येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत महेश शिंदे, प्रतिक वाईकर, सागर पोतदार, रोहन शिंगाडे आणि दिलराजसिंग सेनगर यांनी पहाडी बिल्लाजच्या विजयात निर्णायक भूमिका पार पाडली. त्यांनी शेवटच्या साखळी सामन्यात 50-30 असा विजय मिळवत उपांत्यफेरीत प्रवेश मिळवला.
बचावात शिंदे, कर्णधार वाईकर आणि पोतदार यांनी चमक दाखवली. सेनगर आणि शिंगाडे यांनी पाठलाग करताना अनुक्रमे सहा व सात गुणांची कमाई केली. शिंदे आणि वाईकर यांनी अष्टपैलू कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधले. शिंदेने 10 तर, वाईकरने 8 गुण मिळवले.
पँथर्सने फ्रिस्की रेंजर्स तीन गुणांनी (34-31) नमविले आणि ब गटातून पहाडी बिल्लाजसोबत उपांत्यफेरीतील जागा निश्चित केली. तर, अ गटात जगुअर्स आणि चिताज यांनी शेवटच्या चार संघात स्थान मिळवले.
दरम्यान, महिला गटाच्या स्पर्धेत पँथर्स संघाने आपला विजयी फॉर्म कायम ठेवत चिताज संघावर सलग तिसरा विजय मिळवला. हरयाणाच्या बिंदूने पाठलाग करताना 10 गुण मिळवले आणि पँथर्सच्या 34-32 अशा विजयात आपले योगदान दिले. या विजयामुळे पँथर्स संघाने जेतेपदावर शिक्कामोर्तब केले आहे. कारण, त्यांनी आपल्या तिन्ही लढतीत विजय मिळवत 3-0 अशी आघाडी घेतली.
केकेएफआय आणि अल्टिमेट खो खो (यूकेके) यांनी प्रथमच वैज्ञानिक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते. सुरू असलेली ही स्पर्धा खेळाडू मूल्यांकन प्रक्रियेचा एक भाग आहे.स्पर्धेतील उपांत्यफेरीच्या लढती आणि अंतिम सामना सोमवारी पार पडेल.