जेव्हा जेव्हा भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील कसोटी सामन्यांबद्दल चर्चा होते. त्यावेळी अनेकांना २००१ला झालेली कोलकाता कसोटी आठवल्याशिवाय रहावत नाही. तसेच त्या सामन्यातील राहुल द्रविड-व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्यातील भागीदारीची चर्चा आजही होताना दिसतात.
२००१ ला ऑस्ट्रेलिया संघ भारत दौऱ्यावर आला असताना दुसरा कसोटी सामना कोलकाताच्या इडन गार्डनवर झाला होता. त्यासामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाने फॉलोऑन दिल्यानंतरही भारताने हा सामना जिंकला होता. भारताच्या या विजयात राहुल द्रविड-व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्यातील भागीदारी, हरभजनने घेतलेली हॅट्रिकने महत्त्वाचा वाटा उचलला होता.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने फॉलोऑन दिल्यानंतर भारताने दुसऱ्या डावातही सुरुवातीच्या विकेट्स लवकर गमावल्या होत्या. पण त्यानंतर द्रविड आणि लक्ष्मणने ३७६ धावांची भादीदारी केली. यावेळी द्रविडने १८० आणि लक्ष्मणनेे २८१ धावा केल्या होत्या.
त्यांच्या या भागीदारीमुळे भारताने ६५७धावांवर डाव घोषित केला आणि पहिल्या डावातील २७४ च्या पिछाडीमुळे ऑस्ट्रेलियाला ३८४ धावांचे आव्हान दिले. पण ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात २१२ धावाच करता आल्या. त्यामुळे भारताने हा डाव १७१ धावांनी जिंकला.
मात्र या सामन्यात द्रविड-लक्ष्मणमधील झालेली भागीदारी हरभजनसिंगला पहाताच आली नव्हती. याबद्दल त्याने टाईम्स ऑफ इंडियाच्या स्तंभात लिहिले आहे की ‘मला आठवते त्या भागीदारीदरम्यान आम्ही ड्रेसिंग रूममध्ये आमच्या जागेवरुनसुद्धा हललो नाही. कारण दुसऱ्या डावातही आमच्या विकेट पडत होत्या. पण जेव्हा राहुल द्रविड आणि लक्ष्मण यांच्यात भागीदारी होती तेव्हा सचिनने ठरवलं की आपण जिथे आहोत तिथेच बसू.’
‘अशा प्रकारे विकेट न गमवता ते एक पूर्ण सत्र खेळले. दुसर्या दिवशी आम्ही तेच केले. आम्ही जिथे होतो तिथेच पुन्हा बसलो. जेव्हा मी ड्रेसिंग रूममध्ये बसलो होतो तेव्हा मला लक्ष्मणच्या ऐतिहासिक खेळीचा एकही चेंडू दिसला नाही.’
त्याचबरोबर गांगुलीलाही असे करावे लागले होते. याबद्दल हरभजनने लिहिले आहे की ‘मी लक्ष्मणच्या शतकानंतर फक्त टाळ्या वाजवण्यासाठी बाहेर आलो होतो आणि तो पुढचा चेंडू खेळण्यापूर्वी मी परत त्याच जागेवर जाऊन बसलो.’
‘मला चांगले आठवते की सौरभ गांगुलीने आपला टी-शर्ट काढून टॉवेल खांद्यावर ठेवला होता. दुसऱ्या दिवशीही तो टी-शर्टमध्येच आला आणि जेव्हा सराव झाल्यानंतर सामना सुरू झाला तेव्हा त्याने मागील दिवसाप्रमाणेच टी-शर्ट काढून टॉवेल खांद्यावर घेऊन बसला.’
या सामन्यात हरभजननेही भारताकडून पहिली कसोटी हॅट्ट्रिक नोंदवत रिकी पॉन्टिंग, ऍडम गिलख्रिस्ट, शेन वॉर्न यांना सलग बाद केलं होतं.
ट्रेडिंग घडामोडी-
–जेव्हा टीम इंडिया होती पराभवाच्या छायेत, तेव्हा प्रेक्षकांनी लावली स्टेडियमला आग
-आयपीएल २०२० आता होणार या महिन्यात?
–दुबईहुन परतलेल्या रायगडच्या ११ क्रिकेटपटूंनी कोरोना टेस्टनंतर ठोकली धूम
–बरोबर ८ वर्षापुर्वी याच दिवशी सचिनने घेतला होता मोठा निर्णय
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ३: त्रिशतकाची भविष्यवाणी पदार्पणाआधीच करणारा विरेंद्र सेहवाग!