वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज सध्या भारतीय संघाच्या गोलंदाजी आक्रमणाचा एक महत्वाचा भाग बनला आहे. असे असले तरी, सिराजच्या या यशामागे दिग्गज फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली याचा महत्वाचा वाटा आहे. सिराजच्या मते विराटने केलेल्या समर्थनामुळेच त्याला खूप मोठी संधी मिळाली आणि तो इथपर्यंत पोहोचू शकला.
भारतीय संघाचा (Team India) वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) याने सांगितले की, विराटच्या समर्थनाशिवाय तो आज एवढा यशस्वी होऊ शकला नसता. त्याने सांगितल्यानुसार २०१८ साल त्याच्या कारकिर्दीतील सर्वात खराब काळ होत, परंतु तरीही विराटने त्याच्यावर विश्वास दाखवला आणि संघात कायम ठेवले.
स्वतः सिराजने सांगितले आहे की, विराट कोहली (Virat Kohli) याच्या जागी दुसरा कोणता कर्णधार असता, तर त्याला रिलीज केले असते. २०१८ साली सिराजने आरसीबीसाठी अपेक्षित प्रदर्शन केले नव्हते, तहीही पुढच्या हंगामासाठी त्याला संघात कायम ठेवले गेले होते.
याविषयी बोलताना सिराज म्हणाला, “२०१८ साली आरसीबीसाठी प्रदर्शनाच्या दृष्टीने माझे सर्वात खराब वर्ष होते. जर दुसरा कोणता संघ असता, तर शक्यतो मला रिलीज केले असते. कोणताही दुसऱ्या संघाने मला संघातून बाहेर केले असते, पण विराट कोहलीने माझे खूप समर्थन केले आणि रिटन केले. संपूर्ण क्रेडिट विराट भाईला जाते. मी आज ज्या उंचीवर आहे, ती विराटशिवाय शक्य नव्हती.”
विराटविषयी बोलताना नेहमी म्हटले जाते की, तो वेगवान गोलंदाजांचा कर्णधार आहे. त्याला वेगवान गोलंदाजी खूप आवडते आणि याच कारणास्तव त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने गोलंदाजी आक्रमणात लक्षणीय सुधारणा केली. भारतीय संघ आज जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजी आक्रमाणांपैकी एक आहे.
दरम्यान, आयपीएल २०१८ मध्ये मोहम्मद सिराजने आरसीबीचे प्रतिनिधित्व करताना ११ विकेट्स घेतल्या होत्या. परंतु, त्याचा इकोनॉमी रेट चांगला नव्हता आणि ८.९५ च्या इकोनॉमी रेटने त्याने ३६७ धावा खर्च केल्या. फक्त ६ सामन्यांमध्ये त्याने तब्बल २१२ धावा खर्च केल्या होत्या. असे असले तरी, आरसीबीने त्याच्यावर विश्वास दाखवत संघात रिटने केले होते.