आयपीएल 2024 चा पहिला टप्पा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी बिलकुल चांगला गेला नाही. संघाला पहिल्या 8 पैकी फक्त 1 सामना जिंकता आला आहे. आरसीबी सध्या गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहे.
या हंगामात आरसीबीच्या गोलंदाजांची कामगिरीही खराब राहिली आहे. सनरायझर्स हैदराबादनं आरसीबीविरुद्ध 20 षटकांत विक्रमी 287 धावा केल्या होत्या. हैदराबादनं एवढी मोठी धावसंख्या उभारली, यामध्ये ‘इम्पॅक्ट प्लेअर’ नियमाचा मोठा वाटा आहे. आता आरसीबीच्या मुख्य गोलंदाजांपैकी एक असलेल्या मोहम्मद सिराजनं इम्पॅक्ट प्लेअर नियमाबाबत विधान करताना म्हटलं की, या नियमाचा फलंदाजांना खूप फायदा होत आहे.
मोहम्मद सिराज हसत हसत म्हणाला, “कृपया, हा नियम काढून टाका. खेळपट्ट्या आधीच सपाट आहेत आणि गोलंदाजांसाठीही काहीच उरलं नाही. पूर्वी काही खेळपट्ट्या संथ असायच्या. परंतु आता फलंदाज जवळजवळ प्रत्येकच चेंडूवर बॅट फिरवण्याचा विचार करतोय.”
मोहम्मद सिराज हा जागतिक दर्जाचा गोलंदाज आहे. परंतु त्यानं आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत केवळ 5 विकेट घेतल्या आहेत. या दरम्यान त्यानं 10.35 च्या इकॉनॉमी रेटनं धावा दिल्या. 2024 हे वर्ष सिराजसाठी खूपच व्यस्त राहिलंय. यापूर्वी तो इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेचा भाग होता. आता तो आयपीएल 2024 मध्ये सतत सामने खेळतोय. यामुळे त्याला विश्रांती देण्यासाठी सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यातून बाहेर ठेवण्यात आलं होतं.
यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मानंही इम्पॅक्ट प्लेअर नियमाविरोधात आवाज उठवला आहे. रोहित शर्मा नुकताच एका मुलाखतीत म्हणाला होता की, “क्रिकेट हा 12 नाही तर 11 खेळाडूंचा खेळ आहे. केवळ मनोरंजनासाठी हा खेळ खेळता येणार नाही. या नियमामुळे अष्टपैलू खेळाडूंना गोलंदाजी करण्याची संधी मिळत नाही.”
‘इम्पॅक्ट प्लेअर’ नियम आयपीएलच्या गेल्या हंगामात लागू करण्यात आला होता. मात्र आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा नियम लागू नाही. भारताचा दिग्गज गोलंदाज जहीर खाननं देखील या नियमाविरोधात आवाज उठवला आहे. या नियमामुळे अष्टपैलू खेळाडूंचं महत्त्व कमी होत असल्याचं तो म्हणालाय.
महत्त्वाच्या बातम्या –
साल बदललं, खेळाडू बदलले, मात्र आरसीबीचं नशीब बदलेना! यावर्षी प्लेऑफसाठी पुन्हा जर-तरची परिस्थिती
रोमहर्षक सामन्यात आरसीबीचा अवघ्या एका रननं पराभव, केकेआरनं शेवटच्या चेंडूवर मिळवला विजय
बाद की नाबाद? आऊट दिल्यानंतर अंपायरवरच भडकला विराट कोहली, नो-बॉलवरून मोठा राडा!