चेन्नई। भारत विरुद्ध इंग्लंड संघात एमए चिदंबरम स्टेडियमवर ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरु आहे. या सामन्यात खेळताना इंग्लंडचा कर्णधार जो रुटसाठी हा सामना कारकिर्दीतील १०० वा सामना असल्याचे खास आहे. विशेष म्हणजे त्याने द्विशतक करत या सामन्याला आणखी खास बनवले आहे. याबरोबरच त्याने एक विशेष कारनामा केला आहे.
रुटने टाकले दिग्गजांना मागे
या सामन्यात जो रुटने पहिल्या डावात ३७७ चेंडूत २१८ धावा केल्या. या खेळीत रुटने १९ चौकार आणि २ षटकार मारले. तसेच दुसऱ्या डावात त्याने आक्रमक खेळताना ३२ चेंडूत ४० धावा केल्या. त्यामुळे तो कारकिर्दीतील पहिल्या १०० कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिकवेळा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल क्रमांकावर आला आहे.
त्याने जेव्हा द्विशतक केले तेव्हा ती त्याची कसोटी कारकिर्दीत ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करण्याची ६९ वी वेळ होती. त्याने त्याच्या कारकिर्दीत २० शतकी खेळी केल्या आहेत, ज्यात ५ द्विशतकांचा समावेश आहे. तर ४९ अर्धशतके त्याने कसोटीत केली आहेत.
कारकिर्दीतील पहिल्या १०० कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिकवेळा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत त्याने सुनील गावसकर यांना मागे टाकले आहे. भारताचे महान फलंदाज गावसकर यांनी पहिल्या १०० कसोटी सामन्यांपर्यंत ६६ वेळा ५० धावांचा आकडा पार केला होता. त्यांच्यापाठोपाठ या यादीत ब्रायन लारा आहे. त्याने ६५ वेळा पहिल्या १०० कसोटी सामन्यांपर्यंत ५० धावांचा आकडा पार केला होता.
कारकिर्दीतील पहिल्या १०० कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिकवेळा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करणारे फलंदाज –
६९ – जो रुट
६६ – सुनील गावसकर
६५ – ब्रायन लारा
६४ – सचिन तेंडुलकर
६४ – राहुल द्रविड
६३ – जॅक कॅलिस
रुटचा असाही विक्रम –
चेन्नई येथे भारताविरुद्ध सुरु असलेला हा सामना रुटचा १०० वा कसोटी सामना असल्याने तो १०० व्या कसोटी सामन्यात द्विशतकी खेळी करणारा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. याआधी असा पराक्रम कोणालाही करता आला नव्हता.
सामन्यात इंग्लंडचे वर्चस्व –
इंग्लंडने पहिल्या डावात रुटच्या द्विशतकाच्या जोरावर ५७८ धावांचा डोंगर उभा केला. प्रतिउत्तरादाखल भारताला पहिल्या डावात ३३७ धावा करता आल्या. त्यानंतर इंग्लंडने फॉलोऑन न देता दुसऱ्या डावात फलंदाजी केली. इंग्लंडचा दुसरा डाव १७८ धावांवर संपला. यानंतर चौथ्या दिवसाखेर भारताने १ बाद ३९ धावा केल्या असून आता भारताला पाचव्या दिवशी विजयासाठी ३८१ धावांची गरज आहे. तर इंग्लंडला विजयासाठी ९ धावांची अवश्यकता आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
अश्विनच्या फिरकीत फसला ‘हा’ इंग्लिश फलंदाज, एक-दोन नव्हे तब्बल आठव्यांदा केलंय बाद
शंभराव्या कसोटीत इंग्लंडच्या संघनायकाचा दे घुमा के! चोपल्या २५० हून अधिक धावा