माजी भारतीय कर्णधार एमएस धोनी याची गणना क्रिकेटविश्वातील सर्वात यशस्वी खेळाडूंमध्ये होते. धोनीचा शांत व संयमी स्वभाव आणि मैदानावर निर्णय घेण्याच्या क्षमतेमुळे त्याला कॅप्टनकूल म्हणून ओळखले जाते. मात्र धोनी त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या दिवसात कशा प्रकारचा माणूस होता? याचा खुलासा त्याच्या 20 वर्षे जुन्या रूममेटने केला आहे.
माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्राने 2004 साली एका दौऱ्यावेळी धोनीसोबत खोली शेअर केली होती. या 20 वर्षे जुन्या किस्स्याची आठवण काढताना आकाश चोप्रा म्हणाला, 2004 मध्ये भारतीय अ संघाने झिम्बाब्वे आणि केनियाचा दौरा केला होता. तोपर्यंत मी भारताकडून खेळलो होतो. बंगळुरूमध्ये कॅम्प लागला होता. हॉटेलमध्ये पोहोचल्यावर मला सांगण्यात आले की एमएस धोनी माझा रूममेट आहे. यावर मी त्याला विचारले की, तू कुठून आला आहेस? प्रत्युत्तरात तो म्हणाला की रांचीतून. मी त्याच्याबद्दल थोडेफार ऐकले होते. मी त्याला देवधर ट्रॉफीमध्ये काही देशांतर्गत सामने खेळताना पाहिले होते, परंतु त्यापेक्षा जास्त मी त्याला ओळखत नव्हतो. मला कधीही त्याला बोलण्याची संधी मिळाली नव्हती. बंगळुरूमध्ये आम्ही जवळपास एक महिना रूममेट होतो, पण धोनी पूर्णपणे वेगळा होता.
‘त्याने कधीही रूम सर्व्हिससाठी बोलावले नाही…’
आकाश चोप्रा पुढे म्हणाला की, त्याचा फोन खूप वाजायचा, पण त्याने कधीच उत्तर दिले नाही. जेव्हा मी त्याला विचारले की तो किती वाजता झोपतो? कारण तो कधी झोपतो हे मला जाणून घ्यायचे होते. यावर त्याने उत्तर दिले की, जेव्हा तुला आराम करायचा असेल तेव्हा तू खोलीतील लाईट बंद करू शकतो. तसेच, धोनी नॉनव्हेज खात असे. पण मी शाकाहारी होतो, त्यामुळे रूममेट म्हणून आम्ही योग्य नव्हतो असे मला वाटत होते. पण मी धोनीला जेव्हाही काय खायचे आहे? असे विचारायचो, तेव्हा तो म्हणायचा तुला जे खावेसे वाटते ते. त्याने कधीही रूम सर्व्हिससाठी कुणाला बोलावले नाही, तो खूप लाजाळू होता आणि त्याने संपूर्ण महिनाभर माझ्यासोबत शाकाहारी जेवण खाल्ले होते.
हेही वाचा –
मुंबई इंडियन्सच्या फास्ट बॉलरची दुलीप ट्रॉफीत हवा! अशी कामगिरी करणारा केवळ तिसरा गोलंदाज
VIDEO : युवा फलंदाजाचं दुर्दैव…असा विचित्र रनआऊट यापूर्वी कधीच पाहिला नसेल
जसप्रीत बुमराहकडे इतिहास रचण्याची संधी, केवळ 3 विकेट घेताच बनेल मोठा रेकॉर्ड!