भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज गुरुवारी(२१ जानेवारी) ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरुन हैदराबाद येथे परतला. यानंतर त्याने संध्याकाळी पत्रकार परिषद घेतली होती. यादरम्यान त्याने अनेक गोष्टींवर त्याची मते मांडली. दरम्यान, त्याने त्याच्या आवडत्या कसोटी विकेटबद्दलही सांगितले.
सिराजने या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील मेलबर्न कसोटी सामन्यातून पदार्पण केले होते. त्याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात खेळलेल्या तिन्ही कसोटी सामन्यात शानदार प्रदर्शन केले. त्याने पहिल्याच सामन्यात मार्नस लॅब्यूशेनची ४८ धावांवर असताना विकेट घेतली. ही त्याची कसोटी क्रिकेटमधील पहिली विकेट ठरली. तसेच सिराजने शेवटच्या ब्रिस्बेन येथे झालेल्या सामन्यातही लॅब्यूशेनचीच विकेट घेतली. विशेष म्हणजे या सामन्यात त्याने लॅब्यूशेन आणि मॅथ्यू वेडची एकाच षटकात विकेट घेतली. त्यानंतर त्याने स्मिथची विकेट घेतली. या सामन्यातील लॅब्यूशेनची विकेट आवडती असल्याचे त्याने सांगितले.
सिराज म्हणाला, ‘स्मिथची विकेट महत्त्वाची होती. मी त्याचा झेल सोडला होता, त्यानंतर मी दबावात होतो. पण मीच स्मिथला बाद केले. आमच्या संघासाठी हे महत्त्वाचे ठरले आणि मीही निश्वास टाकला. मी माझ्या संघासाठी चांगली कामगिरी करत राहिलो. माझी आवडती विकेट ही मार्नस लॅब्यूशेन हा आहे. ती विकेट महत्त्वाची होती. मी एकाच षटकात दोन विकेट्स घेतल्या होत्या, त्यामुळे ती भावना खास होती.’
सिराजची कसोटी मालिकेतील कामगिरी –
सिराजने पदार्पणाच्या सामन्यात सर्वांना प्रभावित करताना पहिल्या डावात २ आणि दुसऱ्या डावात ३ अशा मिळून एकूण ५ विकेट्स घेतल्या. तसेच त्या पुढील सामन्यात सिडनी येथे त्याने २ विकेट्स घेतल्या. तसेच सध्या सुरु असलेल्या ब्रिस्बेन कसोटीत त्याने पहिल्या डावात १ आणि दुसऱ्या डावात ५ अशा मिळून ६ विकेट्स घेतल्या. त्यामुळे त्याने या पदार्पणाच्या कसोटी मालिकेत ३ सामन्यात १३ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला.
विमानतळावरुन थेट गाठली स्मशानभूमी –
गुरुवारी सिराज हैदराबादच्या विमानतळावर उतरल्यानंतर घरी न जाता थेट आपल्या वडिलांना श्रद्धांजली वाहण्यासाठी स्मशानभूमीत पोहोचला. भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पोहोचून आठवडाही झाला नव्हता की, सिराजचे वडिल मोहम्मद गौस यांचे निधन झाल्याची दु:खद घटना घडली होती. तरीही आपल्या काळजावर दगड ठेवत त्याने भारतात न परतण्याचा कठीण निर्णय घेतला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएलमध्ये पुनरागमन करण्यासाठी श्रीसंत सज्ज; ‘हे’ तीन संघ लिलावात बोली लावण्याची शक्यता
“…म्हणून माझ्या मनात मोहम्मद सिराज बद्दल सन्मान आहे”, ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराचे वक्तव्य
“भारतीय संघातील पुजाराचे महत्व अनन्यसाधारण”, ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराने केले कौतुक