आयपीएल 2024 मध्ये मंगळवारी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सला लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध दारुण पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामुळे मुंबई इंडियन्सच्या प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याच्या शक्यतांना मोठा धक्का बसला आहे. आता मुंबईला टॉप-4 मध्ये स्थान मिळवण्यासाठी इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावं लागेल. मात्र या सगळ्यामध्ये कर्णधार हार्दिक पांड्यानं एक मोठी भविष्यवाणी केली आहे. त्याच्या टीममधील एक फलंदाज भारतीय क्रिकेट संघाचं भविष्य असल्याचं तो म्हणाला.
हार्दिक पांड्यानं मुंबई इंडियन्सचा युवा फलंदाज नेहाल वढेरा हा भारतीय क्रिकेट संघाचं भविष्य असल्याचं सांगितलं. लखनऊविरुद्धच्या सामन्यात वढेरानं शानदार फलंदाजी केली. याआधी राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यातही त्यानं मोक्याच्या क्षणी मोलाचं योगदान दिलं होतं.
लखनऊविरुद्धचा सामना हरल्यानंतर नेहाल वढेराबद्दल बोलताना हार्दिक पांड्या म्हणाला, “त्यानं राजस्थानविरुद्ध आणि आज ज्या पद्धतीनं फलंदाजी केली ते शानदार होतं. त्यानं गेल्या वर्षीही चांगली कामगिरी केली होती. मात्र टीम कॉम्बिनेशनमुळे तो सुरुवातीच्या सामन्यांमध्ये खेळू शकला नाही. त्याच्या प्रतिभेकडे पाहता तो पुढची अनेक वर्षे मुंबईसाठी आणि भारतासाठीही खेळेल.”
लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात नेहालनं 41 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीनं 46 धावांची समंजस खेळी खेळली. मुंबईनं 5.2 षटकात 27 धावांवर 4 विकेट गमावल्या असताना नेहाल फलंदाजीला आला होता. नेहालनं राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यातही मुंबईसाठी महत्त्वपूर्ण 49 धावांचं योगदान दिलं होतं. हा या मोसमातील त्याचा पहिला सामना होता. आतापर्यंत नेहाल चालू मोसमात फक्त तीन सामने खेळला आहे.
नेहाल वढेरानं आयपीएलच्या गेल्या हंगामातही मुंबई इंडियन्सकडून खेळताना चांगली फंलदाजी केली होती. वढेरानं 14 सामन्यात 145.18 च्या स्ट्राइक रेटनं 241 धावा केल्या होत्या. या दरम्यान त्याच्या बॅटमधून 2 अर्धशतकंही निघाली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
दुखापतग्रस्त मयंक यादवला जसप्रीत बुमराहकडून मिळाल्या खास टिप्स! सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
मुंबई इंडियन्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर होण्याच्या मार्गावर, रोमांचक सामन्यात लखनऊविरुद्ध पराभव
टीम इंडियासाठी ‘गेम चेंजर’ ठरू शकतो हार्दिक पांड्या! जाणून घ्या का मिळाली टी20 विश्वचषकात संधी?