न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना वेलिंग्टन येथे खेळवला जात आहे. या सामन्यात इंग्लंडने आपली पकड मजबूत केली असून न्यूझीलंडला पराभवाचा धोका आहे. न्यूझीलंडला पहिल्या डावात माफक धावसंख्येवर गुंडाळणे हे यामागचे मुख्य कारण आहे. याचे श्रेय इंग्लंडचा वेगवान गोलंदाज गस ऍटकिन्सनला जाते. ऍटकिन्सनने हॅट्ट्रिक घेत खळबळ माजवली. परिणामी किवी संघ 125 धावांवर सर्वबाद झाला. अशाप्रकारे इंग्लंडला पहिल्या डावातील 280 धावांच्या जोरावर 155 धावांची आघाडी मिळाली. गोलंदाजीत ऍटकिन्सनने डावात एकूण चार विकेट्स घेतल्या.
किवी सलामीवीर डेव्हन कॉनवे (11) याला बाद करताना गस ऍटकिन्सनने न्यूझीलंडच्या डावात पहिली विकेट घेतली. यानंतर काही वेळ त्याला विकेट मिळाले नाही. मात्र, त्यानंतर जेव्हा तो आपल्या कोट्यातील नववा षटक आणि न्यूझीलंडच्या डावातील 35 वे षटक टाकायला आला तेव्हा त्याने विकेट्स घेतल्या. या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर त्याने नॅथन स्मिथला (14) बोल्ड केले. यानंतर मॅट हेन्री आणि टीम साऊदी यांना त्याने खाते उघडण्याची संधी दिली नाही. अशा प्रकारे ऍटकिन्सनने आपली हॅट्ट्रिक पूर्ण केली. वेलिंग्टनच्या बेसिन रिझर्व्ह स्टेडियमवर कसोटी हॅटट्रिक घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला आहे. आत्तापर्यंत कोणत्याही गोलंदाजाला हे करण्यात यश आले नव्हते. पण इतिहास रचण्याचे काम ऍटकिन्सनने केले.
GUS ATKINSON IS A HAT-TRICK HERO IN WELLINGTON! ???? #NZvENG pic.twitter.com/CuMJA7zfGw
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) December 6, 2024
या उजव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाने न्यूझीलंडच्या पहिल्या डावात 8.5 षटके टाकली. ज्यात 31 धावा दिल्या. तसेच हॅटट्रिकसह चार विकेट्स घेतल्या. ऍटकिन्सन गेल्या काही काळापासून कसोटीत इंग्लंडच्या गोलंदाजीचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे.
मागील नोव्हेंबर महिन्यात 24 आणि 25 तारखेला सौदी अरेबियातील जेद्दाह येथे झालेल्या आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात ऍटकिन्सनचे नाव देखील समाविष्ट होते. परंतु त्याची निराशा झाली. या इंग्लिश गोलंदाजावर कोणत्याही फ्रेंचायझीने बाजी लावली नाही आणि तो विकला गेला नाही. त्याची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. ऍटकिन्सन याआधी आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा भाग होता. पण त्याला पदार्पणाची संधी मिळाली नाही.
हेही वाचा-
IND VS AUS; वॉशिंग्टनऐवजी अश्विनला संधी का मिळाली, सहाय्यक प्रशिक्षकानं सांगितली आतली गोष्ट
Under 19 Asia Cup: फायनलमध्ये भारत बांग्लादेश आमने-सामने, या दिवशी रंगणार महामुकाबला






