इंग्लंडला क्रिकेटचे जनक म्हटले जात असले तरी या संघाला वनडेतील विश्वविजेता संघ बनण्यासाठी तब्बल 34 वर्षांची वाट पाहावी लागली होती. बरोबर तीन वर्षांपूर्वी म्हणजेच 14 जुलै 2019 रोजी इंग्लंडने वनडे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न पूर्ण केले होते. त्यामुळे क्रिकेट विश्वालाही नवा विश्वविजेता संघ मिळाला होता. 2019 विश्वचषकातील इंग्लंड आणि न्यूझीलंड संघात झालेला अंतिम सामना सर्वात रोमांचकारी सामन्यांमध्येही गणला जातो.
तीन वर्षांपूर्वी इंग्लंड आणि न्यूझीलंड संघात झालेला 2019 विश्वचषकाचा अंतिम सामना निर्धारित प्रत्येकी 50 षटकांनंतर बरोबरीत सुटला होता. विशेष म्हणजे, त्यानंतर पार पडलेली सुपर ओव्हर देखील बरोबरीत सुटली होती. त्यामुळे बाऊंड्री काऊंटच्या नियमानुसार इंग्लंडला विजेता घोषित करण्यात आले होते, तर न्यूझीलंडला मात्र, पराभूत न होऊनही उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.
न्यूझीलंडने केली प्रथम फलंदाजी
या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना मार्टिन गप्टिलची विकेट लवकर गमावली. पण त्यानंतर कर्णधार केन विलियम्सन आणि हेन्री निकोल्स यांनी दुसऱ्या विकेटसाठी 74 धावांची भागीदारी केली. मात्र लियाम प्लंकेटने विलियम्सनला 30 धावांवर बाद करत ही जोडी फोडली. तर, काहीवेळात 55 धावा करुन निकोल्सही बाद झाला.
पण टॉम लॅथमने जिमी निशाम(19), कॉलिन डी ग्रँडहोम(16) यांना साथीला घेत न्यूझीलंडला 230 धावांचा टप्पा पार करुन दिला. लॅथमने 47 धावांची छोटेखानी पण महत्त्वपूर्ण खेळी केली. पण त्याला ख्रिस वोक्सने बाद केले. अखेर न्यूझीलंडने 50 षटकात 241 धावांचा टप्पा गाठला.
इंग्लंडकडून ख्रिस वोक्स आणि लियाम प्लंकेटने सर्वाधिक प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तसेच जोफ्रा आर्चर आणि मार्क वूडने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
बेन स्टोक्सची महत्त्वपूर्ण खेळी
न्यूझीलंडने इंग्लंडला विजयासाठी 50 षटकात 242 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने सुरुवातीला पहिल्या चार फलंदाजांच्या नियमित कालांतराने विकेट गमावल्या होत्या. त्यामुळे त्यांची आवस्था 23.1 षटकात 86 धावात 4 विकेट अशी झाली होती.
पण त्यानंतर बेन स्टोक्स आणि जॉस बटलरने इंग्लंडचा डाव सांभाळताना पाचव्या विकेटसाठी 110 धावांची शतकी भागीदारी रचली. पण 45 व्या षटकात लॉकी फर्ग्यूसनच्या गोलंदाजीवर राखीव क्षेत्ररक्षक टीम साऊथीने 59 धावांवर खेळणाऱ्या बटलरचा सुरेख झेल घेत ही जोडी फोडली. अखेर नंतर पुन्हा इंग्लंडच्या फलंदाजांनी पुन्हा नियमित अंतराने विकेट गमावल्या. मात्र, अखेरपर्यंत बेन स्टोक्सने एकाबाजूने कडवी लढत दिली होती. त्याने इंग्लंडची एक बाजू भक्कमपणे सांभाळताना 98 चेंडूत नाबाद 84 धावांची खेळी केली.
या सामन्यात विजयासाठी शेवटच्या चेंडूवर न्यूझीलंडला 1 विकेटची तर इंग्लंडला 2 धावांची गरज होती. यावेळी बेन स्टोक्स आणि मार्क वूड 2 धावा घेण्यासाठी धावला परंतु, दुसरी धाव घेताना वूड धावबाद झाला. त्यामुळे इंग्लंडच्याही 50 षटकात सर्वबाद 241 धावा झाल्या असल्याने या सामन्यात बरोबरी झाली. त्यामुळे सुपर ओव्हर घेण्यात आली.
न्यूझीलंडकडून लॉकी फर्ग्यूसन आणि निशाम यांनी सर्वाधिक प्रत्येकी 3 विकेट घेतल्या.
सुपर ओव्हरचा थरार
निर्धारित षटकांनंतर सामना बरोबरीत सुटल्यानंतर सुपर ओव्हर खेळवण्यात आली. या सुपर ओव्हरमध्ये इंग्लंडने प्रथम फलंदाजी केली. सुपर ओव्हरमध्ये इंग्लंडकडून फलंदाजी करण्यासाठी आलेल्या जॉस बटलर आणि बेन स्टोक्सने 15 धावा करत न्यूझीलंडसमोर विजयासाठी 16 धावांचे लक्ष्य ठेवले. न्यूझीलंडकडून जिमी निशाम आणि मार्टिन गप्टिलने सुपर ओव्हरच्या शेवटच्या चेंडूपर्यंत झुंज दिली पण त्यांनाही शेवटच्या चेंडूवर 2 धावा घेण्यात अपयश आले आणि सुपर ओव्हरही बरोबरीत संपली.
त्यामुळे अखेर इंग्लंडने न्यूझीलंडच्या तुलनेत आधीक बाऊंड्री मारल्याने इंग्लंडला विश्वविजेते घोषित करण्यात आले.
On this day in 2019, @englandcricket won the most incredible of @cricketworldcup Finals.
Relive the unforgettable finish 🎥 pic.twitter.com/FhJ9NfbrwY
— ICC (@ICC) July 14, 2021
अंतिम सामन्यानंतर वाद
अंतिम सामन्यात कोणताही संघ पराभूत झालेला नसतानाही केवळ बाऊंड्री काऊंटच्या नियमामुळे न्यूझीलंडला उपविजेते घोषित करण्यात आल्याने या नियमाबद्दल बरीच चर्चा झाली. तसेच या नियमामुळे आयसीसीवरही टीका झाली. अखेर आयसीसीने या नियमात बदल करत भविष्यात बरोबरी झाल्यानंतर सामन्याचा निकाल लागेपर्यंत सुपर ओव्हर्स खेळवण्याचा निर्णय घेतला. तसेच या अंतिम सामन्यात पंचांचेही काही निर्णय वादग्रस्त ठरले होते, त्याची देखील चर्चा रंगली होती.
असे असले तरी, हा सामना पुढील अनेक वर्षे सर्वात रोमांचकारी आणि नाट्यपूर्ण सामना म्हणून क्रिकेटप्रेमींच्या स्मरणात राहिल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
दणकेबाज विजयानंतरही टीम इंडियावर ‘नाराज’ आहेत आनंद महिंद्रा; म्हणाले, ‘टीव्ही सुरू करण्याआधीच…’
लॉर्ड्सवर भारत-इंग्लंडमध्ये कोण ठरलंय वरचढ, जाणून घ्या दोन्ही संघांचा या मैदानावरील विक्रम