ICC Cricket World Cup 2023 Final: वनडे विश्वचषक 2023 स्पर्धा मागील महिन्यात संपली होती. आता स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्यानंतर भारतीय ड्रेसिंग रूममध्ये काय स्थिती होती, याविषयी मोहम्मद शमी व्यक्त झाला आहे. शमीने खुलासा करत म्हटले आहे की, अंतिम सामन्यात पराभूत झाल्यानंतर सर्व खेळाडू ड्रेसिंग रूममध्ये होते आणि कुणीच कुणाशी बोलू शकत नव्हते. इतकेच नाही, तर कुणी जेवणही करत नव्हते, तेवढ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आले.
मोहम्मद शमीचे विधान
विश्वचषक 2023 स्पर्धेत मोहम्मद शमी (Mohammed Shami) चांगलाच चमकला होता. त्याने 7 सामन्यात सर्वाधिक 24 विकेट्स घेतल्या होत्या. त्याने माध्यमांशी बोलताना म्हटले की, “विश्वचषक 2023 अंतिम सामन्यात (World Cup 2023 Final) पराभूत झाल्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये कुणीच कुणाशी बोलत नव्हते आणि जेवणही करत नव्हते. अचानक पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आले होते. हे सर्वांसाठीच आश्चर्याची बाब होती आणि त्यांनी आमच्याशी संवाद साधला. तो संवाद सर्वात महत्त्वाचा होता.”
अंतिम सामन्यात भारताचा पराभव
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर 19 नोव्हेंबर रोजी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (INDvsAUS) संघात विश्वचषक 2023 (World Cup 2023) अंतिम सामना खेळला गेला होता. या सामन्यात भारताचा 6 विकेट्सने दारुण पराभव झाला होता. विश्वचषकात भारत एकमेव सामना हारला होता, तोही अंतिम सामन्यात. सलग 9 साखळी सामने जिंकल्यानंतर भारताने बादफेरीतील उपांत्य सामन्यात न्यूझीलंडला पराभवाचा धक्का दिला होता. मात्र, पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला धूळ चारणाऱ्या भारतीय संघाला अंतिम सामन्यात पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदीही अंतिम सामन्यासाठी स्टेडिअममध्ये हजर होते. त्यांनी विजेत्या संघाचा कर्णधार पॅट कमिन्स याच्याकडे ट्रॉफी सोपवली होती. यानंतर काही वेळाने ते भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये पोहोचत खेळाडूंचे धैर्य वाढवले होते. भारतीय खेळाडू खचले होते. कारण, त्यांना माहिती नव्हते की, त्यांच्या संघाचा पराभव का झाला आहे? कारण, भारताने संपूर्ण स्पर्धेत उच्च दर्जाचे प्रदर्शन करत अंतिम सामन्याचे तिकीट मिळवूनही आपल्याच मायदेशात पराभव पत्करला होता. (pacer mohammed shami says no one was talking to anyone in the dressing room after world cup final loss)
हेही वाचा-
‘अभिमानाने सांगतो, मी मुस्लिम आहे…, मला कोण रोखणार?’, Sajda Controversyवर शमीचे मोठे विधान
INDvsSA 3rd T20: ‘करो या मरो’ सामन्यात खेळपट्टी कुणाच्या फायद्याची? पाऊस करणार का एन्ट्री? वाचा सगळं काही