टी20 वर्ल्ड कप 2026 चा थरार 7 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. मात्र, स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (PCB) एका निर्णयामुळे मोठी खळबळ उडाली आहे. आगामी टी20 वर्ल्ड कपमध्ये भारताविरुद्ध होणारा सामना बहिष्कृत करण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतल्याची माहिती समोर आली असून, यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेपासून (ICC) ते ब्रॉडकास्टर्स आणि इतर सर्व भागधारकांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एका अहवालानुसार, आयसीसीच्या कोणत्याही स्पर्धेत भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना सरासरी सुमारे 25 कोटी डॉलर म्हणजेच 2200 कोटी रुपयांहून अधिक महसूल निर्माण करतो. त्यामुळे हा सामना न झाल्यास टी20 वर्ल्ड कपमधील सर्वात मोठ्या उत्पन्नाच्या स्रोतावर पाणी फेरले जाणार आहे.फक्त बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्येच भारत-पाकिस्तान सामना भारत आणि पाकिस्तानमधील तणावपूर्ण राजकीय संबंधांमुळे दोन्ही संघ केवळ आयसीसीच्या बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्येच आमनेसामने येतात. मात्र, या सामन्याची लोकप्रियता इतकी प्रचंड असते की आयसीसी प्रत्येक मोठ्या स्पर्धेत दोन्ही संघांना एकाच गटात ठेवते. चाहत्यांचा उत्साह, प्रेक्षकसंख्या आणि जाहिरातींचा ओघ पाहता हा सामना ब्रॉडकास्टर्ससाठी ‘सुवर्णसंधी’ मानला जातो.
15 फेब्रुवारी रोजी कोलंबो येथे भारत-पाकिस्तान सामना नियोजित आहे. मात्र पाकिस्तानने या सामन्याचा बहिष्कार करण्याची घोषणा केल्यास, सर्व स्टेकहोल्डर्सना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागू शकते.भारतीय ब्रॉडकास्टरला शेकडो कोटींचा फटका सामना न झाल्यास भारतीय मीडिया ब्रॉडकास्टर जिओस्टारलाही मोठा तोटा सहन करावा लागू शकतो.
आयसीसीसोबत सुमारे 3 अब्ज डॉलरच्या करारावर पुन्हा चर्चा सुरू असलेल्या जिओस्टारला या एकाच सामन्यातून 200 ते 250 कोटी रुपयांच्या जाहिरात महसुलाचा फटका बसू शकतो. विशेष म्हणजे, भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान 10 सेकंदांच्या जाहिरातीसाठी तब्बल 40 लाख रुपये आकारले जातात. पीसीबीवर आयसीसीकडून दंडाची शक्यता पाकिस्तानने सामना न खेळल्यास वॉकओव्हरच्या स्थितीत भारताला पूर्ण गुण मिळतील. मात्र, आयसीसीकडे पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर आर्थिक दंड लावण्याचा पूर्ण अधिकार आहे. आयसीसी आणि पीसीबीचे माजी संचार प्रमुख समी-उल-हसन बर्नी यांनी सांगितले की, एका सामन्यामुळे होणारे एकूण नुकसान सुमारे 25 कोटी डॉलर इतके असू शकते. पाकिस्तानची वार्षिक क्रिकेट उत्पन्न सुमारे 3.55 कोटी डॉलर असल्याने, दंड लागल्यास पाकिस्तान क्रिकेटवर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.






