येत्या काही दिवसात भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघ ३ वनडे आणि ३ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. दरम्यान कसोटी मालिकेसाठी बुधवारी (८ डिसेंबर) १८ सदस्यीय खेळाडूंचा संघ जाहीर करण्यात आला आहे. यासह बीसीसीआयने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. विराट कोहलीला वनडे संघाच्या कर्णधार पदावरून काढून टाकण्यात आले आहे. तर ही जबाबदारी रोहित शर्माच्या हाती देण्यात आली आहे. या निर्णयानंतर अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी आपल्या प्रतिक्रीया दिल्या आहेत. अशातच माजी भारतीय क्रिकेटपटू प्रज्ञान ओझाने देखील रोहित शर्माबद्दल मोठी वक्तव्य केले आहे.
आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धा सुरू होण्यापूर्वी विराट कोहलीने टी२० संघाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली होती. त्यानंतर ही जबाबदारी रोहित शर्माला सोपवण्यात आली होती. आता विराट कोहलीला वनडे संघाच्या कर्णधार पदावरून देखील काढून टाकण्यात आले आहे.
रोहित शर्माला कर्णधारपद मिळाल्यानंतर माजी भारतीय क्रिकेटपटू प्रज्ञान ओझाने मोठे वक्तव्य केले आहे. त्याने एका क्रिकेट संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “रोहित शर्माने जेव्हा मुंबई संघात प्रवेश केला होता. त्यावेळी त्याला कर्णधार म्हणून पाहिले जात नव्हते. या गोष्टींना आधीच चालना मिळाली जेव्हा त्याला डेक्कन चार्जर्स संघात संधी मिळाली. ऍडम गिलख्रिस्टला वाटायचे की, रोहित शर्माला संघाचे उपकर्णधारपद दिले पाहिजे.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “रोहित शर्माला त्यावेळी क्रिकेट खेळायला सुरुवात करून जास्त वेळ झाला नव्हता. परंतु ज्याप्रकारे तो क्षेत्ररक्षण सजवायचा, संघ व्यवस्थापनाला रणनिती सांगायचा. त्यावरून त्याच्याकडे असलेल्या नेतृत्वागुणाची झलक दिसू लागली होती. डेक्कन चार्जर्स संघात चर्चा सुरू झाली होती की, जर कोणी ऍडम गिलख्रिस्टची जागा घेऊ शकेल तर तो रोहित शर्मा असेन. रोहित शर्माबद्दल आता लोकांची मत आता बदलली आहेत. एक महान फलंदाज तर आहेच पण त्याच्यात नेतृत्वगुणही आहे.”
महत्वाच्या बातम्या :
रोहित वनडे संघाचा कर्णधार झाल्यानंतर उपकर्णधारपद रिक्त, ‘हे’ ३ खेळाडू आहेत प्रमुख दावेदार
हार्दिकने दिले अकाली निवृत्तीचे संकेत; ‘या’ कारणाने घेऊ शकतो निर्णय