आयसीसी टी -२० विश्वचषक २०२१ स्पर्धेला जोरदार प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेतील पात्रता फेरीतील सामन्यांना सुरुवात झाली असून २३ ऑक्टोबरपासून सुपर -१२ चे सामने खेळवले जाणार आहेत. सुपर-१२ ची दोन गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. भारतीय संघ ग्रूप बी मध्ये आहे. ज्यामध्ये भारतीय संघाचा सामना पाकिस्तान, अफगानिस्तान, न्यूझीलंड आणि इतर दोन संघाविरुद्ध होणार आहे. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे स्टेडियममध्ये कमीत कमी प्रेक्षकांना प्रवेश दिला जात आहे. दरम्यान भारतीय चाहत्यांना स्टेडियमसारखा अनुभव देण्यासाठी आयसीसीने एक खास सोय केली आहे.
भारतीय संघाचा पहिला सामना २४ ऑक्टोबर रोजी पाकिस्तान संघाविरुद्ध होणार आहे. त्यानंतर पुढील सामने अफगानिस्तान आणि न्यूझीलंडसारख्या बलाढ्य संघांविरुद्ध रंगणार आहेत. हे सामने प्रेक्षकांना घरबसल्या नव्हे तर चक्क सिनेमागृहात जाऊन पाहता येणार आहेत. ज्यामुळे चाहत्यांना स्टेडियममध्ये न जाता स्टेडियमसारखा अनुभव घेता येणार आहे. पीव्हीआर सिनेमाने भारतीय प्रेक्षकांना ही संधी उपलब्ध करून दिली आहे.
शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) पीवीआर सिनेमाने पुष्टी केली आहे की, त्यांना आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेचे लाईव्ह प्रसारण करण्याचे अधिकार मिळाले आहेत. पीव्हीआर सिनेमाने एका प्रेसनोटमध्ये म्हटले की, “आम्ही उपांत्यफेरीच्या आणि अंतिम फेरीतील सामन्यांसह टी -२० विश्वचषक २०२१ स्पर्धेतील भारतीय संघाच्या सामन्यांचे लाईव्ह प्रसारण करण्यासाठी आयसीसीसोबत करार केला आहे.”
तसेच त्यांनी पुढे त्यांनी म्हटले की, “या स्पर्धेतील सामने नवी दिल्ली, मुंबई, पुणे आणि अहमदाबादसह ३५ पेक्षा अधिक शहरांच्या ७५ पेक्षा अधिक सिनेमागृहात प्रदर्शित करण्यात येणार आहेत.” भारतीय संघाचा पहिलाच सामना २४ ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. हा हाय व्होल्टेज सामना पाहण्यासाठी जशी स्टेडियममध्ये गर्दी होत असते. तिच गर्दी यंदा सिनेमागृहात पाहायला मिळू शकते.
महत्त्वाच्या बातम्या-
‘कोहलीआधी पुजारा बनला चँपियन, कोणत्या जगात राहतोय आपण!’, सीएसकेचा विजय अन् पुजारा होतोय ट्रेंड
फटाक्यांची आतषबाजी अन् फुलांची उधळण, सीएसकेच्या ऋतुराजचे पुण्यात धूमधडाक्यात स्वागत
टी२० विश्वचषकासाठी युझवेंद्र चहल ऐवजी राहुल चाहरला का दिली टीम इंडियात संधी? विराटचा खुलासा






