भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विन सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. ऑस्ट्रेलियानंतर त्याने इंग्लंडच्या फलंदाजांची नुसती दाणादाण उडवली आहे. नुकत्याच भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात पार पडलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात त्याने ४०० कसोटी विकेट्सचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे भारतीय दिग्गज अनिल कुंबळेंना पछाडत त्याला सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज बनण्याची संधी आहे. याबद्दल अश्विनने महत्त्वपुर्ण वक्तव्य केले आहे.
तिसऱ्या कसोटी सामन्यात जोफ्रा आर्चरला बाद करत अश्विनने कसोटीमध्ये ४०० विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या मानाच्या यादीत स्थान मिळवले. अश्विन कसोटीत ४०० विकेट्स घेणारा जगातील १६ वा तर भारताचा केवळ चौथाच गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी अनिल कुंबळे (६१९), कपिल देव (४३४) आणि हरभजन सिंग (४१७) या भारतीय गोलंदाजांनी हा टप्पा पार केला आहे.
अनिल कुंबळेंच्या विक्रमाबाबत अश्विन म्हणाला…
अशात कसोटीमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या विक्रमात अव्वलस्थानावर ताबा मिळवण्यासाठी अश्विनला फक्त २१८ विकेट्सची गरज आहे. जर त्याने एवढ्या विकेट्स घेतल्या; तर तो कुंबळेना मागे टाकत भारतीय कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट गोलंदाज बनेल.
याविषयी अश्विनला विचारले असता तो म्हणाला की, “तसे तर मी या विक्रमापासून फक्त २१८ विकेट्स दूर आहे. परंतु मी फार पुर्वीच अशा विक्रमांबद्दल विचार करणे सोडून टाकले आहे. माझ्यासाठी हे विक्रम जास्त महत्त्वाचे नाहीत. तर मी गोलंदाजीत अजून काय करू शकतो, मी अजून उत्कृष्ट कसा बनू शकतो, माझ्या संघासाठी मला अजून काय करता येईल, या गोष्टींचा मी जास्त विचार करतो. कारण जेव्हाही एखादा खेळाडू संघात परत येतो, विशेषकरुन मी आता फक्त कसोटी क्रिकेट खेळत आहे; तर माझे हे कर्तव्य आहे की मी संघात महत्त्वाचे योगदान दिले पाहिजे.”
पंधरा वर्षात माझे उत्कृष्ट दिले
पुढे बोलताना अश्विन म्हणाला की, “मला एका वैयक्तिक व्यक्तीच्या आणि एका क्रिकेटपटूच्या रुपात उत्कृष्ट बनायचे आहे. कदाचित याच कारणामुळे मी इतका खुष असतो आणि माझ्या खेळाचा आनंद लुटतो. मी मागील १५ वर्षात सर्वश्रेष्ट कामगिरी केली आहे आणि मला माझ्या याच फॉर्मला कायम ठेवायचे आहे. मला इतक कोणत्याही गोष्टींवर लक्ष विचलित करायचे नाही.”
आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ६०० विकेट्स पूर्ण
तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान, अश्विनने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत बेन स्टोक्सला बाद करत ६०० विकेट्स घेण्याचा कारनामाही केला. तो ६०० आंतरराष्ट्रीय विकेट्स घेणारा पाचवा भारतीय ठरला आहे. त्याच्यापूर्वी अनिल कुंबळे (९५६), हरभजन सिंग (७११), कपिल देव (६८७) आणि जहिर खान (६१०) यांनी हा टप्पा पार केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
पुणेकर क्रिकेटप्रेमींसाठी आहे ‘ही’ बॅड न्यूज! प्रत्यक्ष मैदानावर जाऊन पाहाता येणार नाहीत वनडे सामने