कोरोना महामारीमुळे जवळपास १० महिने बंद असलेले भारतीय क्रिकेट हळूहळू पूर्वपदावर येत आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या यशस्वी आयोजनानंतर इंग्लंडविरुद्धच्या मालिकांना सुरुवात होणार आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सर्वात मोठी वनडे स्पर्धा विजय हजारे ट्रॉफी देखील लवकरच सुरू होईल. या स्पर्धसाठी कर्नाटकने आपल्या संघाची घोषणा केली. विशेष म्हणजे, अनेक वर्षानंतर यावेळी कर्नाटक संघाचे नेतृत्व एक भारतासाठी न खेळलेला खेळाडू करणार आहे.
कर्नाटकला मिळाला नवा कर्णधार
या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी कर्नाटक संघाचे नेतृत्व गेली ७ वर्ष सातत्याने कर्नाटक संघाचा भाग असलेल्या रविकुमार समर्थ याच्या हाती सोपविण्यात आले आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीवेळी कर्नाटक संघाची जबाबदारी अनुभवी करूण नायरच्या खांद्यावर होती. मात्र, या स्पर्धेत कर्नाटकला उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे, रविकुमार समर्थकडे संघाची धुरा सोपविली गेली.
माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट
प्रथमच कर्णधारपदी निवड झालेल्या रविकुमार समर्थने एका मुलाखतीत याविषयी बोलताना म्हटले, “कर्नाटकचा कर्णधार बनणे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. या संघाकडून खेळणेच मी खूप मोठी गोष्ट मानतो. परंतु, आता मला कर्णधार बनवण्यात आले आहे. कुटुंबातील सर्व लोक आनंदी आहेत. मला आशा आहे की, आम्ही स्पर्धेत चांगली कामगिरी करू.”
रवीकुमार समर्थने २०१४ च्या हंगामात कर्नाटकसाठी पदार्पण केले होते. त्याने आतापर्यंत ३२ लिस्ट ए सामने खेळताना ४१.७१ च्या सरासरीने १,१६२ धावा बनविल्या आहेत.
विजय हजारे ट्रॉफीसाठी कर्नाटकचा संघ-
रविकुमार समर्थ (कर्णधार), करुण नायर, देवदत्त पडिक्कल, रोहन कदम, देगा निश्चल, केएल श्रीजीत, शरत बीआर (यष्टीरक्षक), रक्षित एस (यष्टीरक्षक), अनिरुद्ध जोशी, केवी सिद्धार्थ, निकिन जोसे, श्रेयस गोपाल, जगदीश सुचित, कृष्णप्पा गौतम, आदित्य सोमन्ना, शुभांग हेगडे, अभिमन्यु मिथुन, प्रसिद्ध कृष्णा, रोनित मोरे, व्यस्क विजयकुमार, मनोज भांडगे व एमबी दर्शन
महत्वाच्या बातम्या:
दोन कंपन्यांचा मालक बनविणार पहिल्या कसोटीची खेळपट्टी
भारताविरुद्ध शंभरावा कसोटी सामना खेळत या दिग्गजांनी गाजवले मैदान






