मंगळवारपासून(23 एप्रिल) चीनमधील झीआन येथे चालू असलेल्या आशियाई कुस्ती चॅम्पियनशीप स्पर्धा सुरु झाली आहे. या स्पर्धेत भारताचे कुस्तीपटू शानदार कामगिरी करताना दिसत आहेत.
या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी, आज(24 एप्रिल) महाराष्ट्राचा कुस्तीपटू राहुल आवारेने कांस्यपदक पटकावले आहे. त्याने कांस्यपदकासाठी झालेल्या लढतीत कोरियाच्या जे. किमवर 9-2 अशा फरकाने विजय मिळवला आणि भारतासाठी या स्पर्धेतील चौथे पदक जिंकले आहे. राहुलने हे कांस्यपदक फ्रिस्टाईल 61 किलो वजनी गटात पटकावले आहे.
याचबरोबर या स्पर्धेत आज अमित कुमार धनकरने फ्रिस्टाईलमध्ये 74 किलो वजनी गटात रौप्यपदक मिळवले आहे. त्याला अंतिम सामन्यात कझाकस्तानच्या कैसानोवविरुद्ध 0-5 अशा फरकाने पराभव स्विकारावा लागला आहे. त्यामुळे त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
त्याने याआधी 2013 च्या आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये 66 किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळवले होते.
तसेच भारताला यास्पर्धेत आज दिपक पुनियाने फ्रिस्टाईलमध्ये 86 किलो वजनी गटात आणखी एक कांस्यपदक मिळवून दिले आहे. त्याने ताजिकिस्तानच्या कोदिरोवला 8-2 अशा फरकाने पराभूत करत हे कांस्यपदक मिळवले आहे.
या स्पर्धेत काल(23 एप्रिल) भारताच्या बजरंग पुनियाने फ्रिस्टाईल 65 किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळवले तर 9 किलो वजनी गटात प्रविण राणाने रौप्यपदक आणि 97 किलो वजनी गटात सत्यव्रत कादियानने कांस्य पदक जिंकले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
–वाढदिवस विशेष: सचिन आता तरी थांब!!
–आशियाई कुस्ती चॅम्पियनशीपमध्ये भारताच्या बजरंग पुनियाचे सुवर्णयश