---Advertisement---

हेडनच्या मुंगुस बॅटनंतर आता राशिद खान वापरतोय कॅमल बॅट

On: सोमवार, डिसेंबर 30, 2019 2:21 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलियामध्ये सध्या बीग बॅश लीग सुरु आहे. या लीगमध्ये रविवारी(29 डिसेंबर) मेलबर्न रेनिगेड्स विरुद्ध ऍडलेड स्ट्रायकर्स संघात सामना पार पडला. या सामन्यात राशिद खानने ऍडलेडकडून शानदार अष्टपैलू कामगिरी करत संघाच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला.

त्याच्या कामगिरीबरोबरच तो एका वेगळ्या कारणासाठीही सध्या चर्चेत आहे. राशिदने या सामन्यात फलंदाजी करताना एक वेगळ्याच प्रकारची बॅट वापरली.

त्याची बॅट नेहमीसारखी नव्हती तर या बॅटच्या मागची बाजू मधे दबलेली होती, जसे उंटाला दोन बाक (कुबड) असतात. त्याच्या या बॅटची मोठी चर्चा सुरु आहे. या बॅटचा फोटो Cricket.com.au ने तसेच आयसीसीनेही शेअर केला आहे.

Cricket.com.auने शेअर केलेल्या राशिदच्या या कॅमल बॅटच्या फोटोवर सनरायझर्स हैद्राबाद या आयपीएलमधील संघाने प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्विट केले आहे की ‘राशिद ही बॅट आयपीएल 2020 मध्येही घेऊन ये.’ राशिद आयपीएलमध्ये हैद्राबाद संघाकडून खेळतो.

या बॅटच्या मदतीने राशिदने रविवारच्या सामन्यात 16 चेंडूत 2 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 25 धावांची खेळी केली. तो ऍडलेडकडून या सामन्यात सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू ठरला. या सामन्यात ऍडलेडने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 6 बाद 155 धावा केल्या.

त्यानंतर ऍडलेड संघाच्या गोलंदाजांनी 156 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या मेलबर्न संघाला 20 षटकात 8 बाद 137 धावांवर रोखले. त्यामुळे ऍडलेडने 18 धावांनी या सामन्यात विजय मिळवला.

ऍडलेडकडून राशिदने 4 षटकात 15 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. तसेच कॅमरॉन वेलेंट आणि वेस एगारनेही प्रत्येकी 2 विकेट घेत ऍडलेडच्या विजयात योगदान दिले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---