टी२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे आव्हान सुपर१२ फेरीत संपुष्टात आले. या स्पर्धेआधीच विराट कोहलीने टी२० संघाचे कर्णधारपद सोडण्याचे जाहीर केले होते. त्यानंतर तो एकदिवसीय क्रिकेटचे कर्णधारपद देखील सोडू शकतो, असे म्हटले जात होते. आता भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मत व्यक्त केले आहे की, कोविड-१९ शी संबंधित दबावाचा सामना करण्यासाठी विराट कोहली इतर प्रकारामधील आपले कर्णधारपद सोडू शकतो.
कोहलीच्या कर्णधारपदाबद्दल विचारले असता, शास्त्री म्हणाले की, वर्कलोड चांगल्या प्रकारे सांभाळण्यासाठी तो इतर प्रकारातून कर्णधारपदाची जबाबदारी सोडू शकतो.
एका वाहिनीशी बोलताना शास्त्री म्हणाले, ‘गेल्या पाच वर्षांपासून त्याच्या नेतृत्वाखाली भारत कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल स्थानावर आहे. मानसिकदृष्ट्या खचल्याशिवाय तो कसोटी कर्णधारपद सोडणार नाही. मात्र, नजीकच्या काळात फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी तो कर्णधारपदावरून पायउतार होऊ शकतो. हे लगेच होणार नाही. मात्र, मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये असेच घडू शकते. तेव्हा, तो म्हणू शकतो की आता त्याला फक्त कसोटी कर्णधारपदावर लक्ष केंद्रित करायचे आहे.’
कोहलीला सर्वात प्रभावी क्रिकेटपटू म्हणून वर्णन करताना शास्त्री म्हणाले, ‘अनेक यशस्वी खेळाडूंनी त्यांच्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी कर्णधारपद सोडले आहे. त्याला खेळात चांगली कामगिरी करण्याची भूक नक्कीच आहे, तो संघातील इतर खेळाडूंपेक्षा अधिक फिट आहे. त्याबद्दल शंका नाही. जेव्हा तुम्ही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असता, तेव्हा तुमचे वय खेळात देखील वाढते. कर्णधारपदाचा विचार केला, तर तो त्याचा निर्णय असेल. पण माझ्या मते, तो मर्यादित षटकांच्या क्रिकेटला नाही म्हणू शकतो, पण कसोटी क्रिकेटमध्ये त्याने कर्णधारपद पुढे सांभाळले पाहिजे; कारण तो कसोटी क्रिकेटचा सर्वोत्तम क्रिकेटपटू राहिला आहे.’
खेळाडू देशापेक्षा आयपीएलला प्राधान्य देतात, या विश्वचषक विजेता कर्णधार कपिल देव यांच्या आरोपाबाबत विचारले असता शास्त्री म्हणाले, ‘एप्रिलमध्ये आयपीएल पुढे ढकलल्यानंतर बीसीसीआयकडे दुसरा पर्याय नव्हता. भविष्यात ते पुन्हा होईल असे वाटत नाही. कपिलच्या प्रश्नाबाबत मी म्हणेल की, तो आयपीएलच्या वेळापत्रकाबद्दल योग्य बोलला आहे, कारण त्यामुळे खेळाडूंचा थकवा वाढला आहे.’
महत्त्वाच्या बातम्या –
Video: वॉर्नरची पाकिस्तानविरुद्ध सेमीफायनलमधील ‘ही’ चूक ऑस्ट्रेलियाला पडली असती भलतीच महागात
मॅथ्यू वेड म्हणतोय, ‘हसन अलीने जरी झेल घेतला असता, तरी आम्ही जिंकलोच असतो’
पुढीलवर्षी विश्वचषकापूर्वी भारतीय संघ करणार न्यूझीलंड दौरा, असे आहे वेळापत्रक