वनडे विश्वचषक 2023 स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. रविवारी (19 नोव्हेंबर) स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाईल. यजमान भारत आणि पाच वेळचे विश्वविजेते ऑस्ट्रेलिया या अंतिम सामन्यात समोरासमोर येणार आहेत. या अंतिम सामन्यासाठी सर्वजण उत्सुक असतानाच भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने या अंतिम सामन्यात अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन हा खेळू शकतो याचे संकेत दिले आहेत.
भारतीय संघ बारा वर्षानंतर विश्वचषकाचा अंतिम सामना खेळेल. तर ऑस्ट्रेलिया संघ आठ वर्षानंतर अंतिम सामन्यात दिसणार आहे. भारतीय संघाने साखळी फेरी व उपांत्य सामना असे सलग दहा सामने जिंकले आहेत. तर ऑस्ट्रेलियाने पहिल्या दोन सामन्यात झालेल्या पराभवानंतर सलग आठ विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केलाय.
हा सामना अहमदाबाद येथील ज्या खेळपट्टीवर होणार आहे ती खेळपट्टी फिरकीला अनुकूल आहे. याच खेळपट्टीवर भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सामना झाला होता. यामध्ये फिरकी गोलंदाजांनी चांगली कामगिरी करून दाखवली होती. सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत भारतीय कर्णधार रोहित शर्माने या अंतिम सामन्यासाठी सर्व 15 खेळाडू निवडीसाठी उपलब्ध असल्याचे म्हटले. त्यामुळे या खेळपट्टीवर अश्विन याला संधी मिळते का हे पाहणे रंजक आहे.
अश्विनने विश्वचषकात केवळ एक सामना खेळला असून तो पहिलाच सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होता. त्या सामन्यात त्याने उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. तसेच ऑस्ट्रेलियाचे सर्व अनुभवी फलंदाज हे अश्विनसमोर चाचपडताना दिसतात. त्यामुळे अश्विन भारतीय संघाचा भाग होऊ शकतो.
अंतिम सामन्यासाठी संभाव्य भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, रविचंद्रन अश्विन व जसप्रीत बुमराह.
(Ravichandran Ashwin Might Played ODI World Cup Final Against Australia In Place Of Siraj)
हेही वाचा-
‘भारताने पहिली बॅटिंग केली, तर संपलं सगळं…’, CWC 2023 Finalच्या एक दिवसाआधी दिग्गजाची भविष्यवाणी
WHOOP: सचिनचा विक्रम मोडताना विराटच्या मनगटावर होते ‘हे’ खास फिटनेस बँड, फीचर्स पाहून चकितच व्हाल