वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेचा किताब जिंकण्यासाठी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात रविवारी (दि. 19 नोव्हेंबर) लढत होणार आहे. हा सामना 1 लाख 32 हजार प्रेक्षक क्षमतेच्या नरेंद्र मोदी स्टेडिअम येथे खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी आजी-माजी क्रिकेटपटू मोठमोठी विधानं करत आहेत. काहींनी विजेत्यांविषयी भविष्यवाणीही केली आहे. अशात भारताच्या माजी सलामीवीराने मोठी भविष्यवाणी केली आहे. सध्या याचीच सर्वत्र चर्चा रंगली आहे.
काय म्हणाला माजी खेळाडू?
भारतीय संघाचा माजी सलामीवीर आणि समालोचक आकाश चोप्रा (Aakash Chopra) याने भारतीय संघाविषयी विश्वास व्यक्त केला आहे. त्याने म्हटले की, भारतीय संघाने जर फलंदाजीचा निर्णय घेतला, तर सामना त्यांच्या बाजूने जाईल. चोप्राने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्वीट करत म्हटले की, ऑस्ट्रेलियाचे भविष्य त्यांच्या ‘वैयक्तिक’ कामगिरीवर अवलंबून असेल. तसेच, ग्लेन मॅक्सवेल, डेविड वॉर्नर आणि मिचेल मार्श यांसारख्या खेळाडूंना मोठी खेळी करावी लागेल. मात्र, ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी केली तरच. पुढे आकाश चोप्रा असेही म्हणाला की, जर भारताने प्रथम फलंदाजी केली, तर भारत सहज जिंकू शकतो.
आकाश चोप्राचे ट्वीट
ट्विटरवर तब्बल 42 लाखांहून अधिक फॉलोव्हर्स असलेल्या आकाश चोप्राने ट्वीट करत लिहिले की, “उद्या, ऑस्ट्रेलियाचे नशीब फलंदाजीच्या वैयक्तिक कामगिरीवर अवलंबून असेल. आशा आहे की, वॉर्नर, मार्श- मॅक्सवेल यांच्या आयुष्यातील ही महत्त्वाची रात्र असेल. तेही जर ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी केली तरच. जर भारताने प्रथम फलंदाजी केली, तर मला वाटते की, हा भारताच्या बाजूने एकतर्फी सामना होईल.”
Tomorrow, Australia fate will be relying on ‘individual brilliance’ with the bat. Hoping for one between Warner-Marsh-Maxwell to have the night of their lives. And that too…if Australia gets to bat first. If India bats first, I’m expecting a one-sided game in India’s favour 🤗🥳
— Aakash Chopra (@cricketaakash) November 18, 2023
भारतीय खेळाडू तुफान फॉर्ममध्ये
भारतीय संघ विश्वचषक 2023 (Team India In World Cup 2023) स्पर्धेत जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) सलामीला निर्भीडपणे फलंदाजी करून संघाला चांगली सुरुवात करून देतो. त्याने त्याच्या विस्फोटक फलंदाजीने आतापर्यंत 10 सामन्यात 55च्या सरासरीने 550 धावा केल्या आहेत. यामध्ये 1 शतक आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच, विराट कोहली (Virat Kohli) याचीही बॅट चांगलीच तळपत आहे. विराट हा विश्वचषक 2023 स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने 10 सामन्यात 101.57च्या सरासरीने 711 धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याच्या बॅटमधून 3 शतके आणि 5 अर्धशतकांचा पाऊस पडला आहे.
दुसरीकडे, भारताच्या गोलंदाजी विभागातील हुकमी एक्का मोहम्मद शमी हादेखील सध्या चांगल्या लयीत आहे. त्याने अवघ्या 6 सामन्यात उच्च कोटीची गोलंदाजी करत सर्वाधिक 23 विकेट्स घेतल्या आहेत. अशात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील अंतिम सामन्यात काट्याची टक्कर पाहायला मिळणार आहे. या सामन्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. (Ex-Opener’s Hard-hitting Prediction for IND vs AUS WC 2023 Final)
हेही वाचा-
WHOOP: सचिनचा विक्रम मोडताना विराटच्या मनगटावर होते ‘हे’ खास फिटनेस बँड, फीचर्स पाहून चकितच व्हाल
CWC 23 Final: भारताशी भिडण्याच्या 24 तासांपूर्वी कमिन्सने दिली धमकी! म्हणाला, ‘1.3 लाख क्राऊडला शांत…’